‘फिलगुड’मुळे बुडाली भाजपची नाव
By Admin | Updated: November 9, 2015 00:39 IST2015-11-09T00:39:51+5:302015-11-09T00:39:51+5:30
बिहारमध्ये भाजपची नाव पक्षाच्या ‘फिलगुड’च्या जाणिवेने बुडाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांवर पक्षाची तिकिटे विकल्याचे आरोप लावण्यात आले होते

‘फिलगुड’मुळे बुडाली भाजपची नाव
एस.पी. सिन्हा, पाटणा
बिहारमध्ये भाजपची नाव पक्षाच्या ‘फिलगुड’च्या जाणिवेने बुडाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांवर पक्षाची तिकिटे विकल्याचे आरोप लावण्यात आले होते आणि त्यामुळे पक्षाची प्रतिमा चांगलीच डागाळली होती. भाजपच्या एका नेत्याने तिकीट विकल्याचा जाहीर आरोप पक्षाचे खासदार आर.के. सिंग यांनी केला होता. हा आरोप करून त्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे तोफ डागली होती.
‘उपर मोदी, निचे मोदी, घरघर मोदी’ हा भाजपचा नारा होता. मतदार आपल्या झोळीत आहेत, असा विश्वास बाळगण्याची घोडचूक भाजपने केली होती. सुशीलकुमार मोदी यांनी निवडणुकीनंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाचा प्रस्ताव सादर करतील, अशा लोकांनाच मुद्दामहून पक्षाचे तिकीट दिल्याचा आरोप करण्यात आला होता.