नागालँड, मेघालयात विधानसभेच्या ६० जागांसाठी आज होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:56 IST2018-02-27T00:56:39+5:302018-02-27T00:56:39+5:30
नागालँडमधील यंदाची विधानसभा निवडणूक औत्सुक्याचा विषय झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. प्रचाराच्या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत यंदा येथे अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या धर्तीवर प्रचार केला जात आहे. सर्व पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येतात आणि समोर मतदार असतात.

नागालँड, मेघालयात विधानसभेच्या ६० जागांसाठी आज होणार मतदान
दिमापूर : नागालँडमधील यंदाची विधानसभा निवडणूक औत्सुक्याचा विषय झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. प्रचाराच्या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत यंदा येथे अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या धर्तीवर प्रचार केला जात आहे. सर्व पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येतात आणि समोर मतदार असतात. प्रत्येक नेत्याला बोलण्याची संधी दिली जाते. प्रत्येक मतदारसंघात अशा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
‘स्वच्छ निवडणूक अभियान’ असे या मोहिमेचे नाव आहे. राज्यात मंगळवारी मतदान होणार आहे. ‘यूथनेट’या एनजीओचे संस्थापक हेकानी जाखलु यांनी सांगितले, नागा तरुणांना सशक्त बनविण्यासाठी आम्ही हे काम करत आहोत. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून कोट्यवधी रुपये प्रचारासाठी खर्च केले जातात. यूथनेटने असा दावा केला आहे की, या काळात ५७०
कोटी रुपये निवडणुकीच्या प्रचारात खर्च होऊ शकतात. त्यामुळे सामान्यांसाठी एक प्लॅटफॉर्म उभा करण्याचे आम्ही ठरविले असे जाखलु यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
प्रादेशिक पक्षांना महत्त्व-
नागालँडमध्ये एकूण ६० जागा असून, भाजपाने नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) सोबत आघाडी केली आहे. एनडीपीपी ४० जागांवर, तर भाजपा उर्वरित २० जागांवर निवडणूक लढत आहे.
मेघालयात काँग्रेस विरुद्ध भाजपा : काँग्रेसने ५९ व भाजपाने ४७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. कॉनराड संगमा यांची नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि भाजपा स्वतंत्र निवडणूक लढत आहेत.