नागा बंडखोरांवर फास आवळणार
By Admin | Updated: June 12, 2015 23:56 IST2015-06-12T23:56:23+5:302015-06-12T23:56:23+5:30
म्यानमारमधील यशस्वी लष्करी कारवाईनंतर ईशान्येतील दहशतवादी संघटनांवर फास आवळण्याची जय्यत तयारी केंद्र सरकार करीत आहे.

नागा बंडखोरांवर फास आवळणार
नवी दिल्ली : म्यानमारमधील यशस्वी लष्करी कारवाईनंतर ईशान्येतील दहशतवादी संघटनांवर फास आवळण्याची जय्यत तयारी केंद्र सरकार करीत आहे. त्यानुसार या क्षेत्रातील दहशतवादाच्या उच्चाटनाकरिता संयुक्त डावपेच निश्चित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल येत्या १७ जूनला म्यानमारच्या दौऱ्यावर जात आहेत. दुसरीकडे मणिपूरमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यास जबाबदार दहशतवादी संघटना एनएससीएन (खापलांग) वर पुन्हा एकदा निर्बंध घातले जाणार आहेत.
डोवल ईशान्येकडील दहशतवाद्यांविरुद्ध संयुक्त कारवाई अधिक तीव्र करण्यासंदर्भात तेथील अधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करतील. भारत-म्यानमार सीमेवरील लष्करी कारवाईत डोवल यांची महत्त्वाची भूमिका होती.
एनएससीएन (के) वर पुन्हा बंदी येणार
गृहमंत्रालयाने ४ जूनचा हल्ला आणि सुरक्षादलांवर अलीकडे झालेले हल्ले लक्षात घेऊन एस.एस. खापलांगप्रणीत नागा बंडखोर गटाला बेकायदेशीर जाहीर करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळासाठी निवेदन तयार केले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर एनएससीएन(के) चा निर्बंधित संघटनांच्या यादीत समावेश करण्यात येईल.
सुरक्षा परिस्थितीचा आढावा
कोलकाता : ईस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल एम.एम.एस. राय यांनी शुक्रवारी मणिपूरमध्ये जवानांना सतर्क करताना दहशतवादी हल्ले वाढू शकतात आणि ते रोखण्यासाठी आम्हाला संरक्षणात्मक उपाययोजना कराव्या लागतील, असे
सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)