एन. बिरेन सिंग मणिपूरमध्ये भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
By Admin | Updated: March 13, 2017 18:42 IST2017-03-13T18:42:17+5:302017-03-13T18:42:17+5:30
एन. बिरेन सिंग यांचे नाव भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यात आले आहे

एन. बिरेन सिंग मणिपूरमध्ये भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - गोव्याप्रमाणेच मणिपूरमध्येही भाजपाने सत्तेचे गणित जुळवण्यात यश मिळवले आहे. एनपीपी, एनपीएफ, लोकजनशक्ती पक्ष अशांचे समर्थन मिळवत बहुमताचा आकडा भाजपाने गाठला असून, एन. बिरेन सिंग यांचे नाव भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यात आले आहे.
एन. बिरेन सिंग मणिपूरमधील हेइंगांग मतदार संघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला नमवून विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 36.3 टक्के तर काँग्रेसला 35.1 टक्के मते मिळाली होती. मणिपूर विधानसभेत काँग्रेसला 27 तर भाजपाने 21 जागा जिंकल्या होत्या. तर 12 जागा इतरांच्या खात्यात गेल्या होत्या. कुठल्याच पक्षाला बहुमत नसल्याने सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपात चुरस होती. दरम्यान, स्थानिक छोट्या पक्षांना मदतीस घेत भाजपाने त्यात बाजी मारली.