म्यानमार नव्हे मणिपूरमध्येच सैन्याने केली कारवाई
By Admin | Updated: September 16, 2015 12:03 IST2015-09-16T10:32:16+5:302015-09-16T12:03:22+5:30
भारतीय सैन्याने जूनमध्ये म्यानमारमध्ये जाऊन दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केला असला तरी प्रत्यक्षात ही मोहीम म्यानमारमध्ये झालीच नाही असे समजते.

म्यानमार नव्हे मणिपूरमध्येच सैन्याने केली कारवाई
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - भारतीय सैन्याने जूनमध्ये म्यानमारमध्ये जाऊन दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केला असला तरी प्रत्यक्षात सैन्याचे हे ऑपरेशन म्यानमारऐवजी भारताच्या हद्दीतच झाले होते अशी माहिती समोर येत आहे. या मोहीमेतील जवानांना दिलेल्या वीरता पुरस्कारामध्ये म्यानमारमध्ये जाऊन मोहीम राबवल्याचा उल्लेख टाळण्यात आल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे.
भारतीय सैन्याने जूनमध्ये मणिपूर व नागालँडमधील दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केली होती. हे दहशतवादी सीमारेषा ओलांडून म्यानमारच्या हद्दीत तळ ठोकून राहायचे. जूनमध्ये भारतीय सैन्याने थेट म्यानमारच्या हद्दीत जाऊन या दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले व दहशतवाद्यांना ठार मारले असा दावा राज्यवर्धन राठोड यांनी केला होता.
सैन्याने या ऑपरेशनशी संबंधीत अधिकारी व जवान अशा आठ जणांना वीरता पुरस्कार दिला आहे. पुरस्कारात या मोहीमेचा उल्लेख आहे पण मोहीम म्यानमारमध्ये राबवल्याचा उल्लेख कुठेच नाही. त्यामुळे ही मोहीम बहुधा भारत - म्यानमार सीमेजवळ भारताच्या हद्दीतच राबवली गेली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. यापूर्वी जवानांना दिल्या जाणा-या वीरता पुरस्काराच्या प्रशस्ती पत्रकातील मजकूर सार्वजनिक केला जायचा. यंदा मात्र याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. सैन्याच्या प्रवक्त्यांनीही यावर उत्तर देणे टाळले आहे. 'जूनमध्ये आम्ही प्रसिद्धीपत्रक काढून ऑपरेशनची माहिती दिली होती. मणिपूर - नागालँड सीमेजवळ ही मोहीम पार पडली होती' असे सैन्याच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. मात्र ही मोहीम म्यानमारमध्ये जाऊन राबवण्यात आली असे थेट उत्तर त्यांनी दिले नाही.