बिहारमध्ये भाजपाचा पराभव ही माझ्या वडिलांना श्रद्धांजली - सरताज
By Admin | Updated: November 9, 2015 12:05 IST2015-11-09T12:01:27+5:302015-11-09T12:05:11+5:30
बिहार निवडणुकी भारतीय जनता पक्षाचा झालेला दारूण पराभव म्हणजे माझ्या वडिलांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली असल्याचे दादरी हत्याकांडात बळी पडलेल्या मोहम्मद अखलाखच्या मुलाने व्यक्त केली.

बिहारमध्ये भाजपाचा पराभव ही माझ्या वडिलांना श्रद्धांजली - सरताज
>ऑनलाइन लोकमत
दादरी ( उत्तरप्रदेश), दि. ९ - बिहार निवडणुकी भारतीय जनता पक्षाचा झालेला दारूण पराभव म्हणजे माझ्या वडिलांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली आहे, अशी प्रतिक्रिया दादरी हत्याकांडात बळी पडलेल्या मोहम्मद अखलाखचा मुलगा, सरताजने व्यक्त केली आहे. 'आपल्या देशात द्वेषाच्या राजकारणाला जागा नाही, हे बिहारच्या जनतेने दाखवून दिलं. बिहारहमध्ये लागलेला निकाल हा सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधात लागलेला असून तीच माझ्या वडिलांना वाहण्यात आलेल श्रद्धांजली आहे,' असे सरताजने म्हटले आहे.
बीफ साठवून ठेवल्याच्या व ते खाल्ल्याच्या अफवेवरून दोन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील दादरी येथे जमावाने मोहम्मह अखलाख यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचा धाकटा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर देशभरात तणावाचे वातावरण पसरले. या हत्येसाठी केंद्र सरकार कारणीभूत असल्याचा तसेच देशातील असहिष्णू वातावरण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. अनेक नामंवत लेखक, विचारवंत, दिग्दर्शक, निर्माते तसेच वैज्ञानिकांनी या निषेधार्थ त्यांचे पुरस्कारही परत केले. या घटनेचा सामान्य जनतेवरही खोल परिणाम झाल्याचे बिहार निवडणुकीच्या निकालातून दिसून आले. भाजपासाठी अिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या या निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला.
निकाल जाहीर झाल्यानंतर अखलाखचा मोठा मुलगा सरताज याने ही प्रतिक्रिया दिली. हा निकाल सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधात आहे. धर्माच्या नावावर लढून काहीही फायदा होत नाही, याची लोकांना जाणीव झाली पाहिजे. फक्त सत्तेच्या लोभाने देशाचे विभाजन करू नका, असे आवाहन मी देशातील सर्व राजकारण्यांना करतो, असेही सरताज म्हणाला.