ऑनलाइन लोकमतजालंधर, दि. 12 - गेल्या काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध मोहीम छेडल्याने गुरमेहर कौर चर्चेत आली होती. मात्र तिला बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध छेडलेल्या आंदोलनातून तिने माघार घेत दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ती जालंधरला निघून गेली होती. मात्र आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. अनेक दिवसांपासून मनात साचून राहिलेल्या गोष्टींना तिने वाट मोकळी करून दिली आहे. गुरमेहरच्या एका पोस्टमध्ये ""माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं"" असं लिहिलेलं होतं, त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातं होतं. मात्र तिने आता एक ब्लॉग लिहिला आहे. त्या ब्लॉगमधून तिनं धक्कादायक वक्तव्ये केली आहेत. ती लिहिते, "माझे वडील शहीद झाले. मी त्यांची मुलगी आहे. मात्र मी शहिदाची मुलगी नाही." या ब्लॉगची लिंक तिने ट्विटरवही शेअर केली आहे. ट्विटरवर गुरमेहर कौरचे 54 हजार फॉलोव्हर्स आहेत. ब्लॉगमध्ये ती म्हणते, "मी कोण आहे ?, ट्रोल करणारे विचार करतात ती मी आहे का ?, मीडियानं मला सांगितलं आहे ती मी आहे का ?, सेलिब्रिटी विचार करत असलेली ती मी आहे का ?, मात्र मी त्यातली कोणच नाही. मी माझ्या वडिलांची मुलगी आहे. मी माझ्या वडिलांची गुलगुल आहे. मी त्यांची डॉल आहे. मी दोन वर्षांची अशी कलाकार आहे जिला शब्द नाही कळत, मात्र काठीचे आकडे समजतात. जे माझे वडील मला हाक मारण्यासाठी बनवत होते. मी माझ्या आईसाठी डोक्याला ताप आहे. स्वतःचंच खरं करणारी एक मूडी मुलगी आहे. मी वर्गात पहिल्या बाकावर बसणारी मुलगी आहे. जी शिक्षकांना बेधडक प्रश्न विचारून वाद घालत असते. मी एक आदर्शवादी आहे. एथलिट आहे. शांतीची समर्थक आहे. मी तुमच्या अंदाजानुसार रागिष्ट आणि युद्धाला विरोध करणारी गरीब नाही. मला युद्धाची किंमत माहिती असल्यानं युद्ध नकोय. ही किंमत खूप मोठी आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मला जास्त प्रकारे समजतं, कारण मी दररोज याची किंमत चुकवते आहे. याची कोणतीच किंमत नाही. जर असती तर आज काही लोक माझा एवढा तिरस्कार केला नसता."
तत्पूर्वी तिने एबीव्हीपीविरोधात छेडलेल्या मोहिमेतूनही माघार घेतली होती. त्यावेळी तिने सर्वांचं अभिनंदन. मला एकटीला सोडावं अशी विनंती करते. मला जे बोलायचं होतं, ते मी बोलले आहे", असं ट्विट केलं होतं.