ओवेसीचा निषेध म्हणून मुस्लिमांनी रक्ताने लिहिलं 'भारत माता की जय'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 15:37 IST2016-03-18T15:37:48+5:302016-03-18T15:37:48+5:30
असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय' बोलणार नाही केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत असताना मीरतमधील मुस्लिमांनी रक्ताने 'भारत माता की जय' लिहित आपला निषेध नोंदवला

ओवेसीचा निषेध म्हणून मुस्लिमांनी रक्ताने लिहिलं 'भारत माता की जय'
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १८ - ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय' बोलणार नाही केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत असताना मीरतमधील मुस्लिमांनी रक्ताने 'भारत माता की जय' लिहित आपला निषेध नोंदवला. मीरतमधील मुस्लिम बांधवांनी ओवेसीच्या वक्तव्याचा निषेध करत बच्चा पार्कमध्ये मोर्चा काढला. ओवेसी यांनी राजकीय फायद्यासाठी हे वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलनकर्त्या मुस्लिमांनी केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय' बोलणार नाही केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना आता आपल्याच लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. मुस्लिम समाजाचे नेते मोहम्मद इमाम यांनी आपल्या समर्थकांसह हा मोर्चा काढला होता. 'इस्लाम आपल्या लोकांना देशावरचं प्रेम व्यक्त करण्यापासून आणि घोषणा देण्यापासून रोखत नाही. ओवेसी यांचं वक्तव्य देशविरोधी असून ते अमान्य असल्याचं', मोहम्मद इमाम यांनी यावेळी सांगितलं.
इंजेक्शनच्या सहाय्याने इमाम यांचं रक्त काढण्यात आलं आणि त्याच रक्ताने समर्थकांनी भारताच्या नकाशावर 'भारत माता की जय' लिहित आपला निषेध नोंदवला. 'ओवेसी इस्मामला बदनाम करत आहेत. आपण भारतीय आहोत आणि 'भारत माता की जय' म्हणणं आपली जबाबदारी असल्याचं', मोहम्मद इमाम यावेळी बोललेत.