आग्रा: भगवद्गीता वाचणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण झाल्याची अलिगढमध्ये घटना घडली आहे. मुस्लिम समाजाच्याच तरुणांनी ही मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्ती स्वत:च्या घरी भगवद्गीता वाचत असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे 55 वर्षीय दिलशेर काल (गुरुवारी) सकाळी 9 वाजता घरी परतले. त्यानंतर त्यांनी भगवद्गीता वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी समीर, झाकीर आणि काही तरुण दिलशेर यांच्या घरात घुसले. त्यांनी दिलशेर यांना मारहाण केली आणि त्यांच्या घरातील गीता, रामायण आणि हिंदू धर्माशी संबंधित ग्रंथ घेऊन निघून गेले. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं हे वृत्त दिलं आहे. गेल्या 38 वर्षांपासून धार्मिक पुस्तकं वाचत असल्याचं दिलशेर यांनी सांगितलं. 'मी मुस्लिम आहे. पण माझा धर्म मला इतर धर्माचे पवित्र ग्रंथ वाचण्यापासून रोखत नाही,' असंदेखील ते म्हणाले. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अलिगढचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी दिली. आरोपी समीर, झाकीर आणि अन्य अज्ञात तरुणांविरोधात कलम 298 (धार्मिक भावनांना धक्का पोहोचवणे), कलम 323 (मारहाण), कलम 452 (चुकीच्या उद्देषानं घरात घुसखोरी), कलम 504 (शांतता भंग करण्याचा प्रयत्न) आणि कलम 506 (गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भगवद्गीता वाचणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण; तरुणांनी हिसकावली धार्मिक पुस्तकं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 07:43 IST