गर्भवती पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. कर्नाटकची राजधानी बंगळुरुतील एका निवासी भागात ही घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने पोलिस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी शिवम हा मूळचा उत्तर प्रदेशातील कुशीनगरचा रहिवासी असून तो पेंटर आहे. त्याची पत्नी सुमना तीन महिन्यांची गर्भवती होती. दोघांनी सहा महिन्यांपूर्वी लग्न केले होते. दोघेही गेल्या पाच महिन्यांपासून बेंगळुरूमध्ये राहत होते. बुधवारी दुपारी शिवमच्या शेजाऱ्यांनी त्याच्या घरातून उग्र वास येत असल्याची पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना घरात सुमनाचा मृतदेह कुजलेला अवस्थेत आढळला. सुमनाच्या शरिरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. परंतु, तिच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसले. मृतदेहजवळ पोलिसांना दारूची बाटली आणि अन्न आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शिवम आणि सुमनाचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी सहा महिन्यांपूर्वी एकमेकांशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर त्यांच्यात शुल्लक कारणांवरून वारंवार भांडणे होऊ लागली. दरम्यान, सोमवारी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी शिवमने सुमनाला बेदम मारहाण केली. भांडणानंतर दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन झोपले. सोमवारी शिवमने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्याने स्वत:च्या हाताने जेवण बनवून खाल्ले आणि कामावर गेला. कामावरून आल्यानंतर तो दारू प्यायला आणि जेवण करून झोपला. परंतु, बुधवारी सकाळी त्याने पु्न्हा सुमनाला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हाही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शिवम तिच्याजवळ गेला असता सुमना मृतावस्थेत आढळली.
सुमनाचा मृत्यू झाल्याचे कळताच शिवम घरातून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन गुरुवारी सकाळी त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत्युचे नेमेक कारण जाणून घेण्यासाठी सुमनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.