प्रियकराची हत्या, महिलेने केली आत्महत्या
By Admin | Updated: January 16, 2017 05:03 IST2017-01-16T05:03:05+5:302017-01-16T05:03:05+5:30
कर्नाटकच्या राजधानीत पत्नीच्या प्रियकराची पतीने हत्या केली आणि त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रियकराची हत्या, महिलेने केली आत्महत्या
बंगळुरू : कर्नाटकच्या राजधानीत पत्नीच्या प्रियकराची पतीने हत्या केली आणि त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रुती गौडा (३२) ही महिला तिचा प्रियकर अमित केशवमूर्ती याच्याबरोबर कारमध्ये होती. तेव्हा तिचा पती राजेश गौडा तेथे आला आणि त्याने गोळी घालून अमितची हत्या केली. श्रुती शुक्रवारी कारने घराबाहेर पडली होती. रस्त्यात तिने अमितला घेतले. राजेश व त्याचे वडील गोपालकृष्ण गौडा हे दुसऱ्या कारने त्यांचा पाठलाग करीत होते. श्रुतीची कार थांबताच, श्रुतीचा सासरा आणि पती तेथे आले. त्यानंतर रिव्हॉल्व्हरमधून अमितला गोळी मारण्यात आली. रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर कोणी दाबला हे निश्चित झालेले नाही. श्रुतीने जखमी प्रियकराला रुग्णालयात नेले. मात्र, ती त्याचे प्राण वाचवू शकली नाही. प्रियकराच्या मृत्यूनंतर काही वेळाने श्रुती कगालीपुरा येथील एका लॉजवर आली. तिने नातेवाईकांना आपण लॉजच्या खोली क्रमांक ३०१ मध्ये असल्याचे दूरध्वनीवरून कळविले आणि नंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.