नवी दिल्ली - बॉम्बे महाराष्ट्राचा भाग नव्हता, तो गुजरातचा भाग होता. १९५६ मध्ये भाषिक प्रांतरचना झाली तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा भाग झाली. परंतु आजही मुंबईची स्थिती पाहिली तर केवळ ३१-३२ टक्केच लोक मराठी भाषिक आहेत. तितकेच ३२ टक्के हिंदी भाषिक आहेत. २ टक्के भोजपुरी, १२ टक्के गुजराती, ३ टक्के तेलगु, २ टक्के तामिळ, २ टक्के राजस्थानी, ११-१२ टक्के लोक ऊर्दू भाषिक आहेत असं सांगत भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषिकांना डिवचण्याचं काम केले आहे.
एका मुलाखतीत हिंदी-मराठी वादावर निशिकांत दुबे यांनी हे भाष्य केले. यावेळी निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंचा समाचार घेतला. ते म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान आहे ते कुणी नाकारत नाही. परंतु महाराष्ट्र जो कर देतो त्यात सर्वात जास्त योगदान आमचे आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा करदाता स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्याचे मुख्यालय महाराष्ट्रात आहे. ते जे कर देतात त्यात आमचे पैसे नाहीत का? संपूर्ण देशाचा पैसा आहे. महाराष्ट्राचे क्रेडिट डिपॉझिट १०० टक्के आहे. तामिळनाडूत ११० टक्के आहे. जे पैसे आम्ही बँकेत भरतो, ते बँक आपल्या उद्योग धंद्यासाठी पैसे देते त्याला क्रेडिट डिपॉझिट म्हणतात. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, बंगाल, ओडिसा यांचा क्रेडिट दर ४० टक्के आहे. जर आम्ही १०० रूपये जमा करत असू तर आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया ४० रुपये देते आणि महाराष्ट्राला ६० रुपये देते. पैसे आमचे आणि कर महाराष्ट्राच्या खात्यातून जातो असं त्यांनी सांगितले.
तसेच एलआयसीमध्ये सर्वच विमाधारक आहेत, त्याचे मुख्यालय महाराष्ट्रात आहे तर त्याचाही कर महाराष्ट्रात जातो. रिलायन्स इंडस्ट्रीचा कुठलाही उद्योग असो त्याचे पैसे महाराष्ट्रात जातात. बिहारमध्ये टाटाने कंपनी स्थापन केली. जर बिहार नसते तर टाटा कंपनी नसती. आज टाटाचे मुख्यालय महाराष्ट्रात आहे. ते कर देतात. आदित्य बिर्ला मुख्यालय तिथे आहे ते पैसे देतात. जिंदाल कंपनी ते महाराष्ट्राला पैसे देतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या योगदानात आमचाही अधिकार आहे. तुम्ही सक्षम आहात, तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देता त्यात दुमत नाही परंतु आम्हाला दुर्लक्षित करू नका. जर तुम्हाला अमराठी लोक आवडत नसेल तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनसमोर दांडका घेऊन उभे राहा. एलआयसीसमोर जा, त्यांना मराठी येतच नाही. त्यांना मारहाण करा. हिंदी सिनेसृष्टी बंद करा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, सेबी यांचा कुणीही चेअरमन मराठी नाही, या सर्वांना पळवा, इथं मुख्यालय नसतील हे सांगा, हे सर्व करदाते आहेत त्यांना हटवा असं चॅलेंज निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिले.
दरम्यान, जेव्हा जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक असते तेव्हा अशाच प्रकारे गरीब माणसांना मारले जाते. सर्वांना आपल्या मातृभाषेवर गर्व आहे परंतु हिंदी भाषिकांना मारले जाते. माझी मातृभाषा हिंदी आहे. माझे हिंदीवर प्रेम आहे. जिथे कुठे हिंदीवर हल्ला केला जाईल तिथे मी बोलणारच. राज ठाकरे, उद्धव ठाकरे मोठे लॉड्स साहेब नाहीत. मी खासदार आहे कायदा कधी हातात घेत नाही मात्र जेव्हा कधीही हे बाहेर जातील तेव्हा तिथली जनता राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना आपटून आपटून मारतील असं विधान भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केले.