मुंबई-पुण्यातले पर्यटक काश्मीरच्या महापुरात अडकले
By Admin | Updated: September 10, 2014 03:37 IST2014-09-10T03:37:54+5:302014-09-10T03:37:54+5:30
जम्मू-काश्मीरमधील महापुराचा फटका अनेक पर्यटकांनाही बसला असून, यात मुंबई-पुण्यातील पर्यटकांचाही समावेश आहे.

मुंबई-पुण्यातले पर्यटक काश्मीरच्या महापुरात अडकले
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील महापुराचा फटका अनेक पर्यटकांनाही बसला असून, यात मुंबई-पुण्यातील पर्यटकांचाही समावेश आहे. मुंबई-पुण्यातील नामवंत टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या १६ जणांचा संपर्कच तुटला आहे. टूर कंपनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील असे बरेच पर्यटक काश्मिरात अडकल्याची भीती आहे.
जम्मू-काश्मीरच्या महापुरात आतापर्यंत १५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेघर झाले आहेत. आतापर्यंत बचाव पथकाने ४५ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तेथील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि दूरसंचार यंत्रणाही पूर्ण कोलमडली आहे. मुंबई-पुण्यातून केसरी टूर्सतर्फे प्रत्येकी १६ जणांचे असे चार ग्रुप जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते. महापुरामुळे हे पर्यटक तेथे अडकले. यातील दोन ग्रुपना सुखरूपपणे बाहेर काढून मुंबईसाठी रवाना करण्यात आले. १६ जणांचा एक ग्रुप लेहपर्यंत आला असून, त्यांच्याशी केसरीकडून संपर्क साधण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आणखी एक १६ जणांचा ग्रुप श्रीनगरमध्ये अडकल्याचे केसरी टूर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी सांगितले. २४ तासांपूर्वी त्यांच्याशी संपर्क झाला होता. मात्र आता हा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. स्थानिक हॉटेल, टूर आॅपरेटरमार्फत प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.