मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीची कार्यवाही
By Admin | Updated: December 14, 2015 19:11 IST2015-12-14T19:11:45+5:302015-12-14T19:11:45+5:30
विद्यमान संचालक मंडळाने कामकाज करावे

मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीची कार्यवाही
व द्यमान संचालक मंडळाने कामकाज करावे लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यासंदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकार्यांनी कार्यवाही सुरू करावी. निवडणुकीपर्यंत विद्यमान संचालक मंडळाने कामकाज करावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरेश एच.पाटील व न्यायाधीश एस.बी. शुक्रे यांनी दिले आहेत. सोमवारी कृउबाच्या निवडणुकीसंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात कामकाज झाले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची त्वरित निवडणूक घ्यावी यासाठी उच्च न्यायालयात निमगाव वाकडा येथील रंगनाथ गायकर व वेळापूर येथील नारायण पालवे व ॲड. प्रमोद जोशी यांनी याचिका दाखल केली होती. बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांच्यासह संचालकांच्या वतीने ॲड. सुरेश सबरद यांनी दाखल केलेली याचिकाही सोमवारी सुनावणीस आली. या याचिकेत संचालक मंडळाची मुदत दि. ३ नोव्हेंबर रोजी संपलेली असली तरी हे संचालक मंडळ कार्यरत ठेवून निवडणूक घेण्यात यावी, असे म्हटले आहे. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील बाजार समितीच्या होणार्या निवडणुका येत्या सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. शासनाच्या सहकार व वस्त्र उद्योग विभागाच्या वतीने आदेश काढून आदेशाच्या दिनांकापासून सहा महिने मुदतीकरिता या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.याचिकेत सध्या सर्वच सहकारी संस्था निवडणुका सुरू असताना केवळ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकरिता पावसामुळे निवडणुका थांबविणे अयोग्य आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर करावी, अशी मागणी आहे. मागील ७ तारखेला शासनाला प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. लासलगाव बाजार समिती संचालक मंडळाची मुदत दि. ३ नोव्हेंबर रोजी संपलेली आहे.दरम्यान, बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार माजी आमदार कल्याणराव पाटील यांची मुख्य प्रशासक तर सुधीर विलास कराड यांची उपमुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे आदेश क्र मांक १०१५/६२०/११ दि. १० डिसेंबर २०१५ रोजी नागपूर येथील शिबिर कार्यालयातील कक्ष अधिकारी य.ग. पाटील यांच्या सहीने जिल्हा उपनिबंधक यांना नवनियुक्त अशासकीय प्रशासक मंडळाची यादी पाठविण्यात आली आहे.या प्रशासकीय मंडळाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांची मुख्य प्रशासक तर सुधीर विलास कराड यांची उपमुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय मंडळात कैलास रामनारायण सोनवणे, रा.विंचूर, किरण विनायक कुलकर्णी, रा.देवगाव, नानासाहेब दत्ताजी पाटील, रा.लासलगाव, छोटू वामन पानगव्हाणे, रा.उगाव, वैकुंठ विजय पाटील, रा.कुंदेवाडी, संपत शंकर नागरे, रा. डोंगरगाव, शिवाजी बंडू सुरासे, रा.टाकळी विंचूर, अण्णासाहेब किसन जगताप, रा.मरळगोई, भास्कर दामोधर आवारे, रा.वाकद शिरवाडे, बाळासाहेब दामोदर जगताप, रा.लासलगाव, ज्ञानेश्वर भागवत तासकर, रा. रुई, विकास विनायक रायते, रा. खडकमाळेगाव, राजेंद्र लक्ष्मण घायाळ, रा. नैताळे, साहेबराव रामकृष्ण पानगव्हाणे, रा.उगाव, नंदू रामदास कापसे, रा.निफाड, अनंत रामदास साळे, रा.पिंपळस यांची नियुक्ती करण्याकरिता कळविले आहे. परंतु त्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनी अधिकृतपत्र बाजार समितीला पाठविलेले नाही. उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यामुळे आता शासकीय मंडळ येण्याची शक्यता मावळली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती हाती आली आहे.