राजकारण प्रवेशातच मुलायम यांच्या सुनबाई अपर्णा यादवांच्या पदरी निराशा
By Admin | Updated: March 11, 2017 20:26 IST2017-03-11T20:26:43+5:302017-03-11T20:26:43+5:30
काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्या रिटा बहुगुणा जोशींनी अपर्णा यादव यांचा मोठा मताधिक्क्यानं पराभव केला

राजकारण प्रवेशातच मुलायम यांच्या सुनबाई अपर्णा यादवांच्या पदरी निराशा
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 11 - गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशात एकहाती सत्ता गाजवणा-या समाजवादी पार्टीला गाशा गुंडाळावा लागला आहे. भाजपानं सत्ताधारी समाजवादी पक्षाचा थोडाथोडका नव्हे, तर मोठा पराभव केला आहे. विशेष म्हणजे मुलायम सिंह यांच्या धाकट्या सूनबाई अपर्णा यादव यांनाही पर्दापणात पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्या रिटा बहुगुणा जोशींनी अपर्णा यादव यांचा मोठा मताधिक्क्यानं पराभव केला आहे.
लखनऊ कँटोनमेंटमधून अपर्णा यादव यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अपर्णा यादव यांच्या कारकिर्दीत त्यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली होती. अपर्णा यादव यांनी मतदारसंघात अनेक सभा आणि रॅलीही घेतल्या होत्या, मात्र विरोधात असलेल्या रिटा बहुगुणा जोशींसारख्या ताकदवान उमेदवारासमोर त्यांचा निभाव लागला नाही.
अपर्णा यादव यांच्या विजयासाठी लखनऊ कँटोनमेंट मतदारसंघात सासरे मुलायम सिंह यांच्याप्रमाणेच अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव यांनीही सभा घेतल्या होत्या. मात्र या निवडणुकीत यादव कुटुंबीयांना जनतेनं सपशेल नाकारलं आहे. अपर्णा या मुलायम यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीकच्या पत्नी आहेत. अपर्णा यादव यांच्याजवळ लँबोर्गिनी कारसह 23 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
(स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे सर्वात ताकदवान नेते - अमित शाह)
(प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला अपयश, करिअरवर टांगती तलवार)
उत्तर प्रदेशात भाजपानं 315 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस आणि सपा यांची आघाडी असून सपाला 60च्या घरात जागा मिळवता आल्यानं पराभवाची नामुष्की ओढावली आहे.अखिलेश यादवांच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, मुझफ्फरनगरसह राज्याच्या विविध भागातल्या दंगली, नोकऱ्यांपासून सर्व क्षेत्रात यादव समाजाला मिळणारे प्राधान्य, आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव, अशा विविध कारणांमुळे मतदारांची नाराजी मतदानातून स्पष्ट झाली आहे.