ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २१ - उत्तरप्रदेशात सत्तेवर असलेल्या समाजवादी पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. उदयवीर सिंह या सपा आमदाराने पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव यांच्या दुस-या पत्नीला या संघर्षासाठी जबाबदार धरले आहे. मुख्यमंत्री अखिलेश यांच्या विरोधात रचण्यात आलेल्या कारस्थानामागे त्यांची सावत्र आई असून, शिवपाल यादव या कारस्थानाचा राजकीय चेहरा आहेत असे उदयवीर सिंह यांनी लिहीलेल्या चार पानी पत्रात म्हटले आहे.
अखिलेश यादव यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे उदयवीर सिंह समाजवादी पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार आहेत. मोठया मुलाविरोधात कुटुंबातच कारस्थाने रचली जात असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. यादव परिवारातील अंतर्गत चढाओढ पक्षातील संघर्षाला कारणीभूत असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
मुलायमसिंहानी मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा अखिलेश यांचे नाव पुढे केल्यापासूनच ही अंतर्गत कारस्थाने सुरु झाल्याचा दावा उदयवीर यांनी केला आहे. मुलायम सिंह यांच्यावर अखिलेश विरोधी गटाचा दबाव असल्यामुळे त्यांनी जाहीरपणे अखिलेश यांच्यावर टीका केली. पण अखिलेश यांनी काहीही प्रत्युत्तर दिले नाही. जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा पक्षासंबंधी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार तुमच्याकडे होते तसेच आता पक्षाचे सर्वाधिकार तुम्ही अखिलेश यांच्याकडे द्या अशी मागणी उदयवीर यांनी पत्रातून केली आहे.