लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: माजी लष्करप्रमुख मनोज एम. नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील संदर्भांवरून लोकसभेत सुरू असलेल्या गोंधळादरम्यान मंगळवारी लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावल्याप्रकरणी ८ खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. यात काँग्रेसचे ७ व माकपच्या एका सदस्याचा समावेश आहे.
सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील काही संदर्भ देत चीनशी झालेल्या संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला होता. मंगळवारीही हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, अध्यक्षांनी त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली. यादरम्यान राहुल गांधी यांनी या पुस्तकातील लेख सत्यापित करून पटलावर मांडला.
पण त्यांना बोलण्याची परवानगी नाकारून अध्यक्षांनी पुढील वक्त्यांची नावे पुकारताच सभागृहात गोंधळ उडाला. कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. यादरम्यान सदस्यांनी अध्यक्षांच्या दिशेने काही कागदे भिरकावली. यानंतर अध्यक्षांनी बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले जात असल्याचे जाहीर केले.
अध्यक्षांच्या प्रतिष्ठेला धक्का
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहात कागदपत्रे भिरकावल्याप्रकरणी आठ सदस्यांची नावे जाहीर केली. सभागृहाचा अवमान आणि अध्यक्षांच्या आसनाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याच्या आरोपावरून या सदस्यांना नियम ३७४ (२) अन्वये निलंबित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला व सभागृहाने आवाजी मतदानाने त्यास मंजुरी दिली. संसद परिसरात निदर्शने निलंबित सदस्यांनी संसद परिसरात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यात राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे इतर सदस्यही सहभागी झाले होते.
संसदीय कामकाजाचा नियम ३७४ (२) काय आहे?
लोकसभेचे माजी सरचिटणीस पी. डी. आचारी यांच्यानुसार, संसदेच्या कामकाजाशी संबंधित कागदपत्रांचाच संदर्भ नियम ३७४ (२) नुसार देता येऊ शकतो. एकदा सादर केलेली कागदपत्रे सत्यापित झाली की त्या अनुषंगाने सदस्यांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांवर उत्तर किंवा स्पष्टीकरण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. या नियमात संबंधित दस्तऐवज किंवा कागदपत्रे प्रकाशित आहेत की अप्रकाशित, याचा स्पष्टपणे असा उल्लेख नाही.
निलंबित झालेले सदस्य
निलंबित सदस्यांत काँग्रेसचे अमरिंदरसिंग, राजा वडिंग, गुरदीपसिंग औजला, हिबी ईडन, डीन कुरियाकोस, प्रशांत पडोळे, किरणकुमार रेड्डी आणि माणिकम टागोर आणि माकपचे एस. वेंकटेशन यांचा समावेश आहे. अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे फेकण्यात आली तेव्हा अध्यक्षांच्या आसनावर कृष्णा प्रसाद टेनेटी हे सदस्य होते.
Web Summary : Eight MPs were suspended from Lok Sabha after throwing papers towards the Speaker during uproar over remarks related to General Naravane's unpublished autobiography. The suspended MPs include seven from Congress and one from CPI(M).
Web Summary : जनरल नरवणे की अप्रकाशित आत्मकथा पर हंगामे के दौरान लोकसभा अध्यक्ष की ओर कागज फेंकने पर आठ सांसदों को निलंबित कर दिया गया. निलंबित सांसदों में कांग्रेस के सात और सीपीआई (एम) के एक सदस्य शामिल हैं।