MP Ujjain News: 'देव तारी त्याला कोण मारी' अशी मराठीत म्हण आहे. या म्हणीची प्रचिती मध्य प्रदेशातील एका घटनेतून येते. ज्याला कुटुंबीयांनी मृत समजून शोक सुरू केला होता, त्या तरुणाला पोलिस अधिकाऱ्याने CPR (कार्डिओ-पल्मनरी रिससिटेशन) देऊन जिवंत केले. तरुणाने पुन्हा श्वास सुरू केल्याने धाय मोकलून रडणाऱ्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरले.
नेमकं काय घडलं?
मध्य प्रदेशातील नागदा (जिल्हा उज्जैन) येथे ही थरारक घटना घडली. रात्री सुमारे दीड वाजता, नागदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अमृतलाल गवरी नियमित गस्त घालत असताना एक व्यक्ती धावत येऊन आपल्या मुलाने फाशी घेतल्याची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत टीआय गवरी यांनी क्षणाचाही विलंब न करता पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असून तरुण धैर्य यादव फासावर लटकलेला आढळला. पोलिसांनी तात्काळ दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला आणि तरुणाला फासावरून खाली उतरवले. त्याची अवस्था पाहून कुटुंबीयांनी तो मृत झाल्याचा समज करून शोक सुरू केला होता.
CPR ने मिळाले जीवनदान
परिस्थिती गंभीर असतानाही टीआय अमृतलाल गवरी यांनी हार मानली नाही. CPR तंत्राचा वापर करत त्यांनी तरुणाचा जीव वाचवण्याचे प्रयत्न केले. काही मिनिटांतच तरुणाचा श्वास परत आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तातडीने रुग्णालयात दाखल
श्वास परत आल्यानंतर टीआय गवरी यांनी स्वतः तरुणाला आपल्या वाहनातून रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर धैर्य यादवला रतलाम येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून तो पूर्णपणे स्थिर व सुरक्षित असल्याची माहिती आहे. मुलाचा जीव वाचल्याने कुटुंबीयांनी टीआय गवरी यांचे मनापासून आभार मानले.
पोलीस दलाचा सन्मान
या प्रसंगाने नागदा पोलिसांची कर्तव्यनिष्ठा, तत्परता आणि मानवी संवेदनशीलता अधोरेखित केली आहे. उत्कृष्ट धैर्य, दक्षता व कौशल्य दाखवल्याबद्दल कैलाश मकवाना (डीजीपी) यांच्या वतीने टीआय अमृतलाल गवरी यांना ₹10,000 रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
Web Summary : In Madhya Pradesh, a police officer saved a young man who attempted suicide by hanging. The officer's timely CPR revived him, turning the family's despair into relief. He is now recovering in hospital.
Web Summary : मध्य प्रदेश में, एक पुलिस अधिकारी ने फांसी लगाकर आत्महत्या करने की कोशिश कर रहे एक युवक को बचाया। अधिकारी के समय पर किए गए सीपीआर से वह जीवित हो गया, जिससे परिवार का दुख राहत में बदल गया। वह अब अस्पताल में ठीक हो रहा है।