मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात भोपाळ-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर (एनएच-४५) लग्नावरून परतणारी एक टेम्पो टॅक्सी १० फूट खोल दरीत कोसळली, ज्यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात वधू-वरांसह तीन जण जखमी झाले. टेम्पोमध्ये एकूण नऊ लोक होते. रायसेन जिल्ह्यातील बामोर्ही धाब्याजवळील बंदर वाली पुलावर ही घटना घडली.
सोमवारी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला, जेव्हा टेम्पो टॅक्सी चालकाला डुलकी लागली, टॅक्सी नियंत्रणाबाहेर गेली आणि १० फूट खोल दरीत पडली. या अपघातात दोन महिला, एक मुलगी आणि तीन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये वर, वधू आणि आणखी एक व्यक्तीचा समावेश आहे.
रायसेनचे पोलिस अधीक्षक (एसपी) पंकज पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात चालकाला झोप आल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी सुलतानपूर रुग्णालयात नेण्यात आलं, तेथून त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.
लग्नातील कुटुंब हे इंदूर येथील रहिवासी होते आणि लग्न समारंभानंतर बिहारमधील सुपौल जिल्ह्यातून परतत होते. मोहनलाल कुरील, चंदा देवी, नरेंद्र, सरिता, तपस्वी आणि सुनील या लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये दीपक, रवी आणि संगीता यांचा समावेश आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.