Nupur Sharma News: भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगंबरांवरील विधानावरून देशातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. शुक्रवारी नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरात मुस्लिम बांधवांनी तीव्र आंदोलन केले होते. शनिवारी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ अहमदाबादमधील सरखेज गांधीनगर महामार्गावर शेकडो लोकं जमा झाले. नुपूर शर्मा यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यावरून भाजपा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) चांगलेच संतापले आहेत. त्यांनी स्वतःला धर्मनिरपेक्ष उदारमत वादी म्हणवणाऱ्यांना खडेबोल सुनावताना त्यांच्या मौनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गौतम गंभीर यांनी ट्विट केले की, माफी मागणार्या महिलेविरुद्ध देशभरात द्वेष आणि जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल तथाकथित ‘धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यांचे’ मौन नक्कीच बधिर करणारे आहे! #LetsTolerateIntolerance''
''आमच्या पक्षाला तथाकथित असहिष्णुतेचा दोष देणाऱ्या त्या धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यांचे मौन आणखी आश्चर्यकारक आहे. दंगलखोरांनी मुक्ततेने कहर निर्माण केलेल्या काही राज्यांमध्ये व्होट बँकेचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि अशा वर्तनाला परावृत्त करण्यासाठी यूपी सरकारने केलेल्या कृतींचे मी कौतुक करतो. एकविसाव्या शतकातील भारतात अशा प्रकारची वागणूक खपवून घेतली जाणार नाही,''असेही गंभीर म्हणाला.