निवडणुकीत चिथावणीखोर बोलणा-या उमेदवाराची चलती
By Admin | Updated: March 28, 2016 18:04 IST2016-03-28T18:04:06+5:302016-03-28T18:04:06+5:30
कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवारांच्या तुलनेत प्रक्षोभक, चिथावणीखोर भाषण देणा-या उमेदवारांच्या विजयाचे प्रमाण तीनपट जास्त आहे.

निवडणुकीत चिथावणीखोर बोलणा-या उमेदवाराची चलती
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - निवडणूक रिंगणात स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असेल तर, त्याच्या विजयाची शक्यता अधिक असते असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात आकडेवारीवर नजर टाकली तर, कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवारांच्या तुलनेत प्रक्षोभक, चिथावणीखोर भाषण देणा-या उमेदवारांच्या विजयाचे प्रमाण तीनपट जास्त आहे.
इंडिया स्पेंडच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. विश्लेषणामध्ये मागच्या बारावर्षात देशभरात निवडणूक लढवणा-या उमेदवारांवराचा आढावा घेण्यात आला. कुठलाही गुन्हा दाखल नसलेल्या उमेदवाराच्या विजयाचे प्रमाण १० टक्के आहे, गुन्हयाची नोंद नावावर असलेल्या उमेदवाराच्या विजयाचे प्रमाण २० टक्के तर, प्रक्षोभक भाषणे देणा-या उमेदवाराच्या विजयाची टक्केवारी ३० आहे.
संसद आणि विविध विधानसभांमधील ७० सदस्यांविरोधात प्रक्षोभक भाषणांचे खटले प्रलंबित आहेत. या सदस्यांनी स्वत: निवडणूक आयोगाकडे ही माहिती उघड केली आहे. चिथावणीखोर भाषण देणारे सर्वाधिक उमेदवार भाजपचे आहेत.
मागच्या बारावर्षात प्रक्षोभक भाषणाचा आरोप असलेले ३९९ उमेदवारांनी विविध संसदीय आणि विधानसभा निवडणूका लढवल्या. भाजप ९७ उमेदवारांसह या यादीत आघाडीवर आहे.