सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : दहशतवाद्यांच्या हालचालींवर ड्रोनद्वारे पाळत ठेवत सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरातील त्राल परिसरातल्या नादर लोरगाम येथे लष्कर-ए-तय्यबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. आसिफ शेख, आमिर वानी आणि यावर बट अशी त्यांची नावे आहेत.
म्हणाला, सैन्याला पुढे येऊ द्या, मग मी पाहतो : दहशतवादी अमीर वानी व्हिडिओमध्ये आईशी व्हिडिओ कॉलवर दिसत आहे. आई त्याला आत्मसमर्पण करण्यास विनवताना दिसते. ती म्हणते, त्याने आत्मसमर्पण करावे. पण, तो म्हणतो की, सैन्याला पुढे येऊ द्या, मग मी पाहतो.
ड्रोनद्वारे दहशतवाद्यांवर पाळत, व्हिडीओ व्हायरल
अवंतीपोरात दहशतवाद्यांच्या हालचालींवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात आली होती. त्यातील एकजण रायफल घेऊन एका खांबाच्या पाठी लपलेला असून, तो गोळीबार करण्याच्या तयारीत असल्याचे ड्रोनमधील कॅमेऱ्याने टिपले. एका मोडकळीला आलेल्या शेडमध्ये त्या दहशतवाद्यांनी आश्रय घेतला होता, असे आणखी एका व्हिडिओतून उघड झाले. हे व्हिडीओ समाज माध्यमांवरही व्हायरल झाले आहेत.