उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली. अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला त्याच्या आईने फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि स्वतः झोपून घेतले. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी धावत येत फ्रीज उघडून बाळाला बाहेर काढले, तेव्हा हा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. कुटुंबीयांनी जेव्हा बाळाच्या आईला जाब विचारला, तेव्हा तिने दिलेले उत्तर ऐकून सगळे सुन्न झाले.
'बाळ झोपत नव्हते, म्हणून त्याला फ्रीजमध्ये ठेवलं', असे या महिलेने सांगितल्यानंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी भूतबाधा झाल्याच्या संशयातून तिला ताबडतोब गावातील एका मंदिरात नेले. परंतु, तरीही महिलेच्या वागणुकीत सुधारणा न झाल्याने शेवटी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टर काय म्हणाले?महिलेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टर कार्तिकेय गुप्ता यांनी सांगितले की, ती प्रसूतीनंतरच्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा आजार प्रत्येक १०० पैकी ५ महिलांना होतो. यामध्ये महिला स्वतःला किंवा बाळाला इजा पोहोचवू शकते.
बाळ सुखरूप, आईवर उपचार सुरूडॉ. गुप्ता यांनी पुढे सांगितले, "या आजाराविषयी लोकांमध्ये अजूनही जागरूकता फारच कमी आहे. त्यामुळे बऱ्याचदा अशा रुग्णांना आधी तांत्रिकाकडे नेले जाते आणि नंतर रुग्णालयात आणले जाते. सुदैवाने, वेळेवर बाळाला वाचवण्यात यश आले आणि महिलेवर आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत."