‘मदर इंडिया’ला डुडलची आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2015 00:26 IST2015-06-02T00:26:28+5:302015-06-02T00:26:28+5:30
गुगलने सोमवारी प्रसिद्ध अभिनेत्री दिवंगत नर्गिस दत्त अर्थात ‘मदर इंडिया’ यांच्या ८६ व्या जन्मदिनानिमित्त डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे.

‘मदर इंडिया’ला डुडलची आदरांजली
नवी दिल्ली : गुगलने सोमवारी प्रसिद्ध अभिनेत्री दिवंगत नर्गिस दत्त अर्थात ‘मदर इंडिया’ यांच्या ८६ व्या जन्मदिनानिमित्त डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. गुगलच्या डुडलमध्ये नर्गिस यांचे चित्र प्रकाशित करण्यात आले असून त्यांनी दोन्ही हातात आपले पदर पकडले आहे.
नर्गिस यांचे मूळ नाव फातिमा राशीद असून त्यांचा जन्म एक जून १९२९ रोजी झाला होता. १९३५ साली ‘तलाश-ए-हक’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूड जगतात प्रवेश केला होता, मात्र त्यांच्या अभिनय कारकीर्दीस १९४२ च्या ‘तमन्ना’ने झाली होती. १९४०-६० या काळात नर्गिस यांनी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांसोबतच काही कलाकृतींसाठी टीकाकारांकडूनही कौतुकाची थाप मिळविली. यापैकी अनेक चित्रपट अभिनेता आणि निर्माता राज कपूर यांच्यासोबत होते.
१९५७ साली ‘मदर इंडिया’तील राधाने नर्गिस यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. हा चित्रपट अकादमी अवॉर्ड म्हणजेच आॅस्करसाठीही पाठविण्यात आला होता. याच चित्रपटासाठी नर्गिस यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले होते. १९५८ साली नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’तील आपला सहकारी राहिलेल्या अभिनेता सुनील दत्त यांच्याशी लग्न केले होते. यानंतर त्यांनी चित्रपट उद्योगाला रामराम केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)