साडेअकरा हजार जोडप्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य
By Admin | Updated: July 11, 2014 00:36 IST2014-07-11T00:36:56+5:302014-07-11T00:36:56+5:30
ज्ञानेश दुधाडे , अहमदनगर पुढारलेल्या नगर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत ११ हजार ४२४ जोडप्यांना तीन ते पाच अपत्य असल्याचे आढळून आले आहे.

साडेअकरा हजार जोडप्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य
ज्ञानेश दुधाडे , अहमदनगर
पुढारलेल्या नगर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत ११ हजार ४२४ जोडप्यांना तीन ते पाच अपत्य असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, महिला आणि बालकल्याण विभागाच्या आकडेवारी वरून गेल्या तीन वर्षात विविध प्रयत्नामुळे मुलींचा जन्मदर ८१३ वरून मार्च २०१४ पर्यंत ९१८ पर्यंत नेण्यात यश आले आहे.
झपाट्याने वाढणारी लोकसंख्या हा संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. सरकारकडून लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याला जिल्हा देखील अपवाद नाही. जिल्ह्यात नियंत्रित लोकसंख्येसाठी प्रचार, प्रसार आणि प्रसिध्दीसोबत आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात तांबी बसवणे, गर्भ निरोधक गोळ्या आणि निरोध वाटप करणे यांचा समावेश आहे.
दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या जोडप्यांना सरकारकडून विविध सवलतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. असे असतांना जिल्ह्यातील ७६ हजार १८७ जोडप्यांपैकी ८ हजार ४९ जणांना अपत्यच नसून एक अपत्य असणाऱ्या जोडप्यांची संख्या २९ हजार ८०४, दोन अपत्य असणाऱ्यांची संख्या २६ हजार ८०९, तीन अपत्य असणाऱ्यांची संख्या ८ हजार ६८२, चार अपत्य असणाऱ्यांची संख्या २ हजार १६७, पाच किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांची संख्या ६६५ एवढी आहे. जि. प. आरोग्य आणि महिला बालकल्याण विभाग यांनी विविध पातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत आहे. तीन वर्षापूर्वी २०११ ला जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर ८११ पर्यंत होता. त्यात तीन वर्षात वाढ होत, तो ९१८ पर्यंत पोहचला आहे. महिला बालकल्याण विभागाच्यावतीने गर्भसंस्कार, गरोदर मातांचे प्रबोधन, स्त्री जन्माचे स्वागत, बाळाचे जन्मापूर्वी उपाययोजना, माहेर प्रकल्प, जननी प्रकल्प, याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात स्त्री जन्माचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक स्त्री जन्मदर नेवासा ९८० आहे. त्या खालोखाल अकोले ९६५, कोपरगाव ९६१, शेवगाव ९४१, कर्जत आणि राहाता प्रत्येकी ९३४, नगर ९२३, जामखेड ९०६, संगमनेर ९०२, तर पारनेर, राहुरी, पाथर्डी,श्रीगोंदा आणि श्रीरामपूर या तालुक्यात हा आकडा ९०० च्या खाली आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत या जन्मदराचे प्रमाण ९१० होते.
अपत्य नसणारे जोडपे- ८०४९
एक अपत्य असणारे जोडपे- २९८०५
दोन अपत्य असणारे जोडपे- २६८०९
तीन अपत्य असणारे जोडपे- ८६९२
चार अपत्य असणारे जोडपे- २१६७
पाच पेक्षा जास्त अपत्य असणारे जोडपे- ६६५
तालुकानिहाय स्त्री जन्मदराचे प्रमाण
अकोले ९६५, संगमनेर ९०२, शेवगाव ९४१, कर्जत, राहुरी ८९३, श्रीरामपूर ८४६, नेवासा ९८०, जामखेड ९०६, नगर (ग्रामीण)९२३, पारनेर ८९८, पाथर्डी ८१२, श्रीगोंदा ८५०, कोपरगाव ९६१, राहाता ९३४ असे आहे.
तांबी बसविणारे - १४०१३
गर्भनिरोधक गोळ्या वाटप- १४४२१
निरोध वाटप - १६९८८
कुटुुंबकल्याण शस्त्रक्रिया पुरूष १२८
कुटुुंबकल्याण शस्त्रक्रिया स्त्री २२४२१