नवी दिल्ली: देशात जवळपास सर्वच भागांत सक्रिय असलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
ईशान्य आणि पूर्व भारताच्या भागातील राज्ये सोडली तर देशात बहुतांश भागांत या ऑगस्टमध्ये सरासरीइतका पाऊस पडेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
यंदा मान्सून दाखल झाल्यापासून जून-जुलैमध्ये सरासरीपेखा अधिक पाऊस झाला असून हिमाचल प्रदेशात यंदा प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, गुरुवारी गुजरातमध्ये पावसाचा जोर वाढला असून सरदार सरोवर धरणाचे पाच गेट उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पात पाणीपातळी १३१ मीटरपर्यंत पोहोचली आहे. राजस्थानातही बहुतांश भागांत पाऊस सुरू असून मोठ्या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. सखल भागांत पाणी साचल्याने अनेक गावांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामानाचा अंदाज
गुजरात, राजस्थानसह उत्तर भारतात २ ऑगस्टपर्यंत बहुतांश भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दिल्लीत ३ ऑगस्टपर्यंत दिवसभर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हवेच्या गुणवत्तेचा सूचकांक ५८ एक्यूआय इतका होता. हा समाधानकारक मानला जातो.