केरळमध्ये आठवडाभर उशिराने येणार मान्सून
By Admin | Updated: May 15, 2016 13:04 IST2016-05-15T12:58:43+5:302016-05-15T13:04:32+5:30
दुष्काळाच्या झळा आणि उकाडा तीव्र होत असताना संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागून राहिली आहे. दोन दिवसांपूर्वी मान्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज होता.

केरळमध्ये आठवडाभर उशिराने येणार मान्सून
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - दुष्काळाच्या झळा आणि उकाडा तीव्र होत असताना संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागून राहिली आहे. दोन दिवसांपूर्वी मान्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला होता. पण आता वेधशाऴेने केरळमध्ये मान्सूनचे आगमन आठवडाभर उशिराने होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
जो मान्सून केरळमध्ये एक जूनला येणार होता तो आता सात जूनला येईल असा अंदाज वेधशाऴेने वर्तवला आहे. मान्सून अंदमानात १८ ते २० मे दरम्यान दाखल होईल असा अंदाज आहे. मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मुंबईत १२ जून पासून पाऊस धारा बरसू लागतील असा अंदाज होता.
मात्र आता केरळमध्येच मान्सून उशिरा येणार असल्याने महाराष्ट्रासह देशातील अन्य भागातही मान्सूनचे आगमन लांबणीवर जाऊ शकते. सध्या देशातील अनेक भाग दुष्काळाने त्रस्त आहेत. लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शहरातही नागरीक उकाडयाने त्रासले आहे. त्यामुळे शेतक-यापासून सर्वसामान्य सर्वांचेच डोळे आभाळाकडे लागले आहेत.