मान्सूनसाठी प्रभावशाली असलेल्या ला नीनाचा प्रभाव संपला असल्याचे अमेरिकेच्या वेधशाळेने जाहीर केले आहे. यामुळे भारतात यंदाचा मान्सून कसा असेल याचा अंदाज लावणे कठीण जाणार आहे. गुरुवारी रात्री अमेरिकेने याची घोषणा केली आहे.
ला नीना हे भारतासाठी महत्वाचे होते. चांगल्या पावसासाठी ही अनुकुल स्थिती असायची. यामुळे गेल्या काही वर्षांत भारतात चांगला पाऊस झाला आहे. परंतू, ला नीना ही परिस्थिती आता संपल्याने येणारा मान्सून कसा असेल काहीच सांगता येणे कठीण जाणार आहे. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या हवामान तज्ञांनी देखील एक मोठी बातमी दिली आहे. हिंदी महासागरातील परिस्थिती देखील किमान ऑगस्टपर्यंत 'तटस्थ' राहण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
प्रशांत महासागरातील वातावरण हिवाळ्यापर्यंत तटस्थ राहण्याची शक्यता आहे. अल नीना परिस्थिती संपणे हे भारतातील मान्सूनसाठी चांगले देखील ठरू शकते असे तज्ञांचे मत आहे. यामुळे हंगामात दुष्काळ किंवा जास्त पाऊस पडण्याची शक्यता कमी होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जेव्हा पश्चिम हिंदी महासागरातील पाणी पूर्वेकडील पाण्यापेक्षा जास्त गरम असते तेव्हा मान्सूनसाठी चांगले वातावरण तयार होते. सप्टेंबरपर्यंत तटस्थ परिस्थिती कायम राहण्याची शक्यता ५०% पेक्षा जास्त असल्याचे मत अमेरिकेच्या संस्थेने व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वीच या वर्षीच्या मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. या वर्षी हवामान विभागाने यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात अल निनोची शक्यता फेटाळून लावली आहे. २०२३ मध्ये एल निनोमुळे खूप त्रास झाला. यामुळे, पावसाळ्यात ६% घट नोंदवण्यात आली. तर गेल्या वर्षी ८% जास्त पाऊस पडला होता. देशात उष्णतेचा पारा वाढला आहे. या उन्हाळ्यात मान्सूनपूर्वी भारताला सामान्यपेक्षा जास्त तापमानाचा सामना करावा लागेल. एप्रिल ते जून दरम्यान, भारतात सरासरी चार ते सात उष्णतेच्या लाटेचे दिवस असतात. या वर्षी पूर्व भारतातील काही भागात १० दिवसांपर्यंत उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यता आला होता.