मान्सूनचा सावध अंदाज
By Admin | Updated: April 23, 2015 06:11 IST2015-04-23T06:11:35+5:302015-04-23T06:11:35+5:30
स्कायमेट या खासगी संस्थेने १०३ टक्के पावसाचे शुभसंकेत दिलेले असतानाच लागोपाठ दुसऱ्याही वर्षी सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करीत बुधवारी केंद्र सरकारने अंदाजातही

मान्सूनचा सावध अंदाज
नवी दिल्ली : स्कायमेट या खासगी संस्थेने १०३ टक्के पावसाचे शुभसंकेत दिलेले असतानाच लागोपाठ दुसऱ्याही वर्षी सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करीत बुधवारी केंद्र सरकारने अंदाजातही आखडता हात घेतला. या कमी पावसाला अल-निनो जबाबदार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यांमुळे आधीच शेतकरी संकटात सापडला असताना अंदाज वर्तवितानाही सरकारने सावध पवित्रा घेतला आहे.
यंदाच्या मान्सूचा पहिला अंदाज बुधवारी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. यामध्ये यंदाच्या मान्सूनवर अल-निनोचा परिणाम होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यंदा सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता २८ टक्के आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३३ टक्के आहे. त्याचवेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची कोणतीही शक्यता नाही, असेही सांगण्यात आले आहे. देशाच्या कोणत्या भागात कसा पाऊस पडेल, याचा अंदाज पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याने त्याचा देशाच्या वायव्य भागांत आणि मध्य भारतावर सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो. मान्सून दीर्घकालिक सरासरीच्या
९३ टक्के राहील आणि तो सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी राहण्याची शक्यता आहे, असे
डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकारांना सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)