लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नैऋत्य माेसमी पाऊस अर्थात मान्सूनचे नियोजित वेळेपेक्षा आठवडाभर आधीच आगमन झाले असून शनिवारी तो केरळमध्ये दाखल झाला. २००९ नंतर प्रथमच मान्सून लवकर आला आहे. यावर्षी २३ मे रोजीच या पावसाने केरळमध्ये वर्दी दिली होती. साधारणपणे १ जून रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होतो.
१९७५ नंतरच्या आकडेवारीनुसार १९९० मध्ये मान्सून केरळमध्ये सर्वांत लवकर १३ दिवस आधी म्हणजे १९ मे रोजीच दाखल झाला होता. मान्सून लवकर किंवा उशिरा येणे म्हणजे देशाच्या अन्य भागांतही तो त्याच वेगाने पोहोचेल असे नाही. ते त्या वेळच्या स्थितीवर अवलंबून असते.
महाराष्ट्रासाठी शुभसंकेत....
मान्सून महाराष्ट्रात लवकरच दाखल होईल. दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या वाटचालीसाठी स्थिती अनुकूल असल्याचे मुंबई येथील विभागीय हवामानशास्त्र केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी सांगितले. मान्सून हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे त्या म्हणाल्या. सध्या मान्सूनबाबत व्यक्त करण्यात आलेला अंदाज हा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रावरून मांडण्यात आला आहे.
इकडे पाऊस, तिकडे ऊन
केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्हे आणि गोव्यात सात दिवस मुसळधारेचा अंदाज आहे. उत्तरेत पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये २६ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम असेल.
कुठे कोणता अलर्ट? : कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सातारा-कोल्हापूर घाटात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा, तर रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
केरळमधील आगमनाच्या नोंदी
वर्ष तारीख
२०२३ ३० मे२०२२ ८ जून२०२१ ३ जून२०२० १ जून२०१९ ८ जून२०१८ २९ मे