मोदींच्या हायटेक स्वप्नात माकडांचे विघ्न
By Admin | Updated: April 2, 2015 23:44 IST2015-04-02T23:44:12+5:302015-04-02T23:44:12+5:30
भरघोस मताधिक्याने निवडून देणाऱ्या वाराणसी शहराला हायटेक करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे;

मोदींच्या हायटेक स्वप्नात माकडांचे विघ्न
वाराणसी : भरघोस मताधिक्याने निवडून देणाऱ्या वाराणसी शहराला हायटेक करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे; पण या स्वप्नाच्या पूर्ततेत सध्या अनेक विघ्ने येत असून, सर्वात मोठा त्रास माकडांचा आहे. गंगा नदीकिनारी टाकलेल्या फायबर केबल माकडांनी तोडून टाकल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली असून, हा प्रश्न सोडवावा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
वाराणसी शहरातील अडचणी
माकडांची अडचण तर आहेच, पण वाराणसी शहर हे गर्दीचे आहे. शहरात २० लाख लोक राहत असून, प्रत्येक विभागात खचाखच गर्दी आहे, त्यामुळे येथे अंडरग्राऊंड केबल टाकणेही कठीण जात आहे.
मोदी यांची योजना
भारतातील २ लाख ५० हजार खेडी परस्परांशी जोडण्यासाठी मोदी सरकारने तीन वर्षांच्या कालावधीत ७ लाख कि.मी. ब्रॉडबँड केबल टाकण्याचा निर्धार केला आहे. त्याचप्रमाणे २०२० पर्यंत १०० नवी स्मार्ट शहरे बांधली जाणार असून, या शहरांना इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरून शिक्षण व आरोग्य सुविधा देण्याचीही योजना आहे.
या योजनेअंतर्गत विकसित केले जाणारे वाराणसी हे पहिले शहर असून, २५०० जागी ब्रॉडबँड केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
तसेच देशात अधिकाधिक लोकांकडे स्मार्टफोन यावेत अशीही योजना आहे. २०१७ पर्यंत भारतातील एक तृतीयांश लोकसंख्येकडे स्मार्ट फोन असतील, त्यांचा इंटरनेटशी संपर्क असेल असे मोदी सरकारचे स्वप्न आहे. इंटरनेटचा प्रसार होऊन ते अधिक स्वस्त झाल्यास भारताच्या जीडीपीत चार वर्षांच्या कालावधीत ७० अब्ज डॉलरची भर पडू शकते असे हे गणित आहे. पण भारतातील गर्दी व गोंधळ असणाऱ्या शहरांत तंत्रज्ञानाने शिस्त आणणे हे एक मोठे आव्हान आहे. (वृत्तसंस्था)