मोहन भागवत हे आधुनिक हिटलरच - प्रकाश आंबेडकर
By Admin | Updated: September 17, 2016 05:30 IST2016-09-17T05:30:51+5:302016-09-17T05:30:51+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आधुनिक हिटलर आहेत, अशी टीका भारतीय रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केली.

मोहन भागवत हे आधुनिक हिटलरच - प्रकाश आंबेडकर
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आधुनिक हिटलर आहेत, अशी टीका भारतीय रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केली. दिल्लीत आयोजित मेळाव्यात दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी दलितांवरील अत्याचारांवरून मोदी सरकारवर टीका केली.
दलित, महिला तसेच अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तिथे आंबेडकर म्हणाले की, समानतेवर आधारित व्यवस्था हवी की मनुवादी, हे लोकांनाच ठरवावे लागेल. सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि फुटीरवादी कार्यक्रम संघ थोपवीत असून, सरकारी पातळीवर याचे समर्थन वा त्यावर कार्यवाही होता कामा नये. या दलित स्वाभिमान संघर्ष मेळाव्यात त्यांनी दलितांच्या सुरक्षेसाठी अॅट्रॉसिटी कायदा कठोर स्वरूपात लागू करावा आणि खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
सामाजिक जडणघडण मोदी सरकार नष्ट करीत आहे, असा आरोप माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला. गोहत्येच्या नावावर दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. यात दोषींविरुद्ध कठोर कारवाई व्हावी. गोरक्षाच्या नावावर स्थापन झालेल्या संघटनांवर बंदी का घातली जात नाही? दलितांना घटनात्मक अधिकारापासून वंचित का ठेवले जाते? असा सवाल त्यांनी केला. वृंदा करात, डी. राजा, सुधाकर रेड्डी, पॉल दिवाकर यांचाही मेळाव्यात सहभाग होता. रोहित वेमुलाची आई आणि कन्हैयाकुमार हेही सामील होते.
अपयशावर पांघरूण टाकण्यासाठी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. महागाई कायम आहे. भ्रष्टाचारही होत आहे. विकासाचा फायदाही सर्वसामान्य जनेतला मिळालेला नाही. त्यामुळे आपल्या अपयशावरील लक्ष विचलित करण्यासाठी दलितांना लक्ष्य केले जात आहे. या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याची गरज आहे. जे समानतेबाबत बोलतात त्यांना लक्ष्य केले जात आहे, असे कन्हैयाकुमार यावेळी म्हणाले.