मोदींचा विजय हा भारतीयांचा विजय - काँग्रेस नेत्याची स्तुतिसुमने
By Admin | Updated: January 21, 2015 20:21 IST2015-01-21T20:20:27+5:302015-01-21T20:21:54+5:30
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा विजय हा भारतीयांचा विजय असून ते भारतीयांच्या जवळचे नेते आहे अशी स्तुतीसुमने काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी उधळली आहे.
मोदींचा विजय हा भारतीयांचा विजय - काँग्रेस नेत्याची स्तुतिसुमने
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा विजय हा भारतीयांचा विजय असून ते भारतीयांच्या जवळचे नेते आहे अशी स्तुतीसुमने काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी उधळली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानेच मोदींचे कौतुक केल्याने वाद निर्माण होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी या वक्तव्यावरुन घुमजाव करत माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला गेला असे स्पष्टीकरणही दिले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी एका वेबसाईटला मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी मोदींचे भरभरुन कौतुक केले. 'मोदींनी भारतीय राजकारणात नवीन युगाची सुरुवात केली. मतदारांना ते भारताचे नागरिक आहे हे सामाजिकदृष्ट्या समजवण्यात मोदी आणि भाजपा यशस्वी ठरले. ते भावनिकदृष्ट्या भारतीयांच्या अत्यंत जवळचे नेते आहेत' असे द्विवेदी यांनी म्हटले आहे. 'लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि मोदींचा विजय नसून तो काँग्रेसचा पराभव होता' असेही त्यांनी नमुद केले.
जनार्दन द्विवेदी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून द्विवेदी यांना ओळखले जाते. त्यामुळे द्विवेदी यांनीच मोदींचे कौतुक केल्याने वाद निर्माण झाला. ही मुलाखत प्रसिद्ध होताच द्विवेदी यांनी मुलाखतीमध्ये माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी मोदी युगाची सुरुवात झाली असे म्हटले नसून आता मोदींचे दिवस सुरु असल्याचे म्हटले होते असा दावाही त्यांनी केला. काँग्रेस नेते शशी थरुर यांनीदेखील मोदींचे कौतुक केले होते. मात्र यानंतर त्यांना प्रवक्तेपदावरुन हटवण्यात आले होते. आता द्विवेदींवर कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.