मोदींचे ‘मिशन मंत्रिमंडळ’ २३ पासून
By Admin | Updated: May 22, 2014 01:18 IST2014-05-22T01:18:43+5:302014-05-22T01:18:43+5:30
पाच दिवसांनंतर होणार्या शपथविधीमध्ये कोणाची वर्णी लागणार हे नरेंद्र मोदी यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे.

मोदींचे ‘मिशन मंत्रिमंडळ’ २३ पासून
गजानन जानभोर, नवी दिल्ली - पाच दिवसांनंतर होणार्या शपथविधीमध्ये कोणाची वर्णी लागणार हे नरेंद्र मोदी यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे. अजून कोणाशीही त्यांनी याबाबत चर्चा केलेलीे नाही; पण ते २३ मेपासून ‘मिशन मंत्रिमंडळ’ सुरू करणार आहेत. मोदींच्या मनात काय आहे हे भल्याभल्यांना कळत नाही, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते सांगत आहेत. त्यामुळेच भाजपा आणि मित्र पक्षांमधून मंत्रिपद नेमके कोणाला मिळणार या विषयी अद्याप केवळ तर्कवितर्कच लढविले जात आहेत. वजनदार नेत्यांची नावे संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत टाकून ती वॉटस्अॅपवर टाकणार्या उत्साही जनांची संख्याही कमी नाही. मोदी एक एक पायरी चढून जात आहेत. एकावेळी सर्व विषयांना त्यांनी मुद्दामच हात घातला नाही. स्वत:ची भाजपा सांसदीय मंडळाच्या नेतेपदी निवड होईपर्यंत त्यांनी मंत्रिमंडळाचा विषयच कुठे छेडला नाही. दोन दिवस ते गुजरातमध्ये व्यस्त आहेत आणि तेथून परतल्यानंतर २३ तारखेपासून मंत्रिमंडळ रचनेबाबत भाजपाचे नेते आणि एनडीएच्या घटक पक्षांशी चर्चा सुरू करणार आहेत. राज्यमंत्र्यांची बनतेय यादी पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर, संघटन सरचिटणीस रामलाल आणि सरचिटणीस जगतकुमार नढ्ढा व अनंतकुमार हे पक्षातर्फे प्रत्येक राज्यातील प्रमुख पाच ते दहा प्रमुख खासदारांचे प्रोफाईल तयार करीत आहेत. २३ तारखेला ते मोदी यांना दिले जातील. राज्यमंत्री निवडण्यासाठी ही प्रक्रिया अवलंबिली जात आहे. अर्थातच अंतिम निर्णय कोअर कमिटीचा आणि मोदींचा असेल. त्यांच्यासमोर डाटा तयार असावा म्हणून प्रोफाईल तयार केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थात या यादीचा उपयोग मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी होणार आहे. नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथसिंह, वेंकय्या नायडू, गोपीनाथ मुंडे, डॉ.मुरली मनोहर जोशी, श्रीपाद नाईक, सुमित्रा महाजन, रामविलास पासवान, डॉ.हर्षवर्धन, अनंतकुमार,बंडारू दत्तात्रय, मुख्तार अब्बास नकवी, शाहनवाज हुसेन अशा मोठ्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्याचा आधार घेऊन दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ याद्यांचे पेव फुटले आहे.