मोदींची पहिली सभा कोल्हापूरमध्ये
By Admin | Updated: September 29, 2014 07:20 IST2014-09-29T07:20:12+5:302014-09-29T07:20:12+5:30
कोल्हापूर येथील जाहीर सभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करणार असल्याचे समजते

मोदींची पहिली सभा कोल्हापूरमध्ये
मुंबई : कोल्हापूर येथील जाहीर सभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करणार असल्याचे समजते. मोदी यांनी राज्यात किमान १५ जाहीर सभा घेण्याची तयारी दाखवली आहे. त्याचवेळी सोमवारपासून दोन दिवसांत राज्यभरात ३०० जाहीरसभा घेण्याचा ‘मुलुख मैदान’ हा कार्यक्रम भाजपाने हाती घेतला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने महाराष्ट्रातील सभेच्या तारखा प्रदेश भाजपाला कळवल्या असून आता मोदींनी कुठे सभा घ्याव्या याबाबतची शिफारस त्यांच्या कार्यालयास सादर केली जाणार आहे. त्यानुसार कोल्हापूरातून प्रचाराची सुरुवात होणार असल्याचे समजते.
मुलुख मैदान कार्यक्रमात घेतल्या जाणाऱ्या या सभांच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सभा घेतली जाईल, असे भाजपाच्या प्रवक्त्याने सांगितले. केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह हे दक्षिण महाराष्ट्रात, राष्ट्रीय उपाध्यक्ष पुरुषोत्तम रुपाला हे सातारा-सांगलीत, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी या पुण्यात, माजी खासदार व क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू मुंबईत, राष्ट्रीय सचिव मुरलीधर राव लातूर-सोलापूरात, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे ठाण्यात, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर नाशिकमध्ये, केंद्रीय मंत्री उमा भारती, कैलाश मिश्रा, संतोष गंगवार हेही काही सभा घेणार आहेत. याखेरीज प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार व पंकजा मुंडे हेही वेगवेगळ््या ठिकाणी जाहीर सभा घेतील. (विशेष प्रतिनिधी)