मोदींची ब्रिटन दौऱ्यात महाराणीसोबत मेजवानी
By Admin | Updated: November 1, 2015 02:42 IST2015-11-01T02:42:54+5:302015-11-01T02:42:54+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ब्रिटनच्या पहिल्याच सरकारी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाषण करतील आणि
मोदींची ब्रिटन दौऱ्यात महाराणीसोबत मेजवानी
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ब्रिटनच्या पहिल्याच सरकारी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाषण करतील आणि महाराणी एलिझाबेथ यांच्यासमवेत बकिंगहॅम राजवाड्यात मेजवानीत सहभागी होतील.
गोध्राकांडानंतर गुजरातेत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेपाठोपाठ ब्रिटननेही मोदींना प्रवेश नाकारला होता. आता त्या घटनेला बरेच दिवस उलटून गेले असून, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तोच ब्रिटन आता पंतप्रधानांचे भव्य स्वागत करण्यास सज्ज झाला आहे. या दौऱ्यात ऐतिहासिक विम्ब्ले स्टेडियमवर त्यांचा भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे. ते अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतील आणि हाऊस आॅफ कॉमन्स व हाऊस आॅफ लॉर्डस् या संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाषण करतील. १२ नोव्हेंबरला त्यांचा दौरा सुरू होणार असून, १३ नोव्हेंबरला ते महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत मेजवानीत सहभागी होतील. १२ नोव्हेंबरला ते १०, डाऊनिंग स्ट्रीट येथे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी चर्चा करतील. अफगाण-पाकिस्तानातील स्थिती, इसिसचा वाढता प्रभाव, आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध लढा यांचा चर्चेत समावेश असण्याची शक्यता आहे.
मोदी या दौऱ्यावर असताना तेथील संसदेचे अधिवेशन चालू राहणार नाही; मात्र त्यांच्यासाठी संसदेचे खास अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यातच मोदी भाषण करतील. यापूर्वी नेपाळ, श्रीलंका, फिजी, आॅस्ट्रेलिया या देशांच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अशाच प्रकारे तेथील संसदेत भाषणे केली होती.
२००६ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ब्रिटनला भेट दिली होती. त्यानंतर गेल्या १० वर्षांत ब्रिटनला जाणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान होणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)