हाती झाडू घेऊन मोदींचे 'स्वच्छ भारत' मिशन सुरू
By Admin | Updated: October 2, 2014 13:57 IST2014-10-02T09:10:42+5:302014-10-02T13:57:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हातात झाडू घेऊन दिल्लीतील वाल्मिकी वस्तीची सफाई करत 'स्वच्छ भारत'मिशनचा शुभारंभ केला.

हाती झाडू घेऊन मोदींचे 'स्वच्छ भारत' मिशन सुरू
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - राजधानी दिल्लीतील वाल्मिकी वस्तीचा परिसर आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साफ केला. गांधीजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानाचा नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ झाला.
राजघाटावर गांधीजींना आदरांजली वाहून मोदी वाल्मिकी मंदिरात पोचले. तेथे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली आणि हे अभियान सुरू झाले. १५ ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोदींनी या अभियानाची घोषणा करत २०१९ पर्यंत महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी 'स्वच्छ भारत मिशन' ही लोकचळवळ बनवण्याचे आवाहन केले होते. त्याअंतर्गत आज २ ऑक्टोबर रोजी देशभरात कार्यरत असलेले केंद्र सरकारचे ३१ लाख कर्मचारी विविध सार्वजनिक समारंभांमध्ये स्वच्छतेची शपथ घेणार आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या लक्षावधी कर्मचारीही या स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभागी होणार आहेत.तसेच राष्ट्रपती भवनातील सर्व कर्मचारी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सामील होणार असून ते संपूर्ण राष्ट्रपती भवन परिसराची स्वच्छता करतील.
दरम्यान या अभियानाच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी इंडिया गेटे येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
काय म्हणाले मोदी?
आज महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री या दोघांची जयंती आहे. शास्त्रीजींच्या 'जय जवान, जय किसान' या घोषणेला सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत देशातील शेतक-यांनी धान्याची कोठारं भरली होती. शास्त्रीजींप्रमाणेच गांधीजींनीही 'क्विट इंडिया, क्लिन इंडिया' हे स्वप्न पाहिले होते. त्यांचे स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले असले तरीही 'स्वच्छ भारताचे' स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आता आपण भारत स्वच्छ करण्याचा संकल्प करूया. देश स्वच्छ ठेवणे हे फक्त सफाई कर्मचा-यांचे काम नाहीये. देशातील सव्वाशे कोटी जनता हे भारतमातेचे सुपूत्र असून देश स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मीसुद्धा प्रथम या देशाचा पुत्र आहे आणि नंतर पंतप्रधान. त्यामुळे देश स्वच्छ राखण्याची मी आजपासून शपथ घेतो, त्याची सुरूवात मी माझं घर, गल्ली आणि गावापासून करणार आहे.
अस्वच्छतेमुळे आजार पसरतात आणि त्यानंतर औषधोपचारांसाठी लोकांचे खूप पैसे खर्च होतात, गरिबांना तर ते परवडतही नाही. जर देश स्वच्छ ठेवला तर आपण लोकांचे सहा हजार रुपये वाचवू शकतो. सर्व देशवासियांनी या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे.
आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून नऊ लोकांना आमंत्रण पाठवून त्यांना सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करण्यास सांगितले आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता सलमान खान, कमल हसन, प्रियांका चोप्रा, तारक मेहता मालिकेची संपूर्ण टीम, अनिल अंबानी, योगगुरू बाबा रामदेव, काँग्रेस नेते शशी थरूर, मृदुला सिन्हा यांचा समावेश असून त्यांनी आणखी नऊ लोकांना आमंत्रि करावे असे आवाहनही केले आहे. 'एक कदम स्वच्छता की ओर' हा नवा नारा असून आपण स्वच्छ भारतासाठी स्वतंत्र वेबसाईट आणि सोशल साईटवरही अभियान करणार आहोत. त्यानंतर 'मी कचरा करणार नाही, इतरांना कचरा करू देणार नाही' अशी स्वच्छतेची शपथ मोदींनी विद्यार्थ्यांसिहत सर्व उपस्थितांना दिली.
मोदींचे अभियान कौतुकास्पद, सर्वांनी सहभागी व्हावे- आमिर खान
नरेंद्र मोदींचे 'स्वच्छ भारता'चे हे अभियान कौतुकास्पद असून सर्वांनी या अभियानात सहभागी व्हायला हवे असे मत अभिनेता आमिर खानने व्यक्त केले. मी घरात नेहमी स्वत: साफसफाई करतो. माझ्या कार्यालयातही आम्ही ओल्या कच-याचे खत बनलतो. साफसफाईमुळे परिसतर स्वच्छ राहतो, ज्यामुळे आपण निरोगी राहू शकतो. या अभियानात सहभागी होऊन सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडावे असे मी आवाहन करतो.