मोदींना मोदींचाच आशीर्वाद; राहुल यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2015 02:48 IST2015-06-16T02:48:03+5:302015-06-16T02:48:03+5:30

केवळ एक व्यक्ती देश आणि सरकार चालवीत आहेत, ते म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांनी घोटाळ्यात गुंतलेले आयपीएलचे फरार माजी आयुक्त ललित मोदी

Modi's blessings on Modi; Rahul's attack | मोदींना मोदींचाच आशीर्वाद; राहुल यांचा हल्ला

मोदींना मोदींचाच आशीर्वाद; राहुल यांचा हल्ला

नवी दिल्ली : केवळ एक व्यक्ती देश आणि सरकार चालवीत आहेत, ते म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांनी घोटाळ्यात गुंतलेले आयपीएलचे फरार माजी आयुक्त ललित मोदी यांना संरक्षण देणे थांबवावे, असे स्पष्ट करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधानांवर हल्ला करीत ‘मोदीगेट’ प्रकरणी आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत.
ललित मोदींना संपूर्ण भाजप आणि सरकार मदत आणि प्रोत्साहन देत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौन संमतीनेच हे सारे घडले असल्याने त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करीत काँग्रेसने हल्ल्याचा रोख थेट पंतप्रधान कार्यालयाकडे वळविला आहे.
विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक बनलेल्या काँग्रेसने त्यांच्या निवासस्थानाबाहेर धडक देत जोरदार निदर्शने केली, त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. ललित मोदी यांना ब्रिटनमध्ये प्रवासासाठी दस्तऐवज मिळवून देण्यासाठी मदत केल्याने स्वराज वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
सोमवारी दुपारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत स्वराज यांच्या सफदरजंग लेन येथील निवासस्थानी धडक देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. स्वराज यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून तडकाफडकी बडतर्फ करावे अशा घोषणा देत निदर्शकांनी स्वराज यांच्या प्रतिमाही जाळल्या. ललित मोदींना कॅन्सरपीडित पत्नीवर पोर्तुगालमध्ये शस्त्रक्रियेच्यावेळी हजर राहता यावे यासाठी ब्रिटनमधून प्रवासाचे दस्तऐवज मिळवून देण्याबाबत स्वराज यांनी ब्रिटिश खासदार केथ वाझ यांना पाठविलेला ई-मेल लीक झाल्यानंतर वाद उफाळला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

गुन्हेगारांसाठी ‘अच्छे दिन’
-गुन्हेगारांसाठी अच्छे दिन आले आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी दिली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, रामदेवबाबा आणि ललित मोदी यांच्या नावाचा उल्लेखही त्यांनी ट्टिटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत केला. हत्या, बनावट चकमक, काळा पैसा, फेमामध्ये आरोपी असलेले अमित शहा, रामदेव बाबा ते ललित मोदींपर्यंत सर्वांसाठी अच्छे दिन आले आहेत.
-सुषमाजींचा मी अतिशय आदर करतो, त्यांनी लूक आऊट नोटीसपासून बचाव करीत फरार झालेल्या आणि लंडनमध्ये सुटी घालवत असलेल्या व्यक्तीला मदत केली आहे. त्या भाजपच्या अंतर्गत राजकारणाच्या शिकार बनल्याचे बोलले जात आहे. त्यांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकत राजीनामा द्यायला हवा, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी माफी मागावी
-ललित मोदींना स्वराज यांनी केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी आणि स्पष्टीकरण द्यावे. भाजपने स्वराज यांच्या पाठीशी उभे ठाकणे हे दुटप्पीपणाचे आहे. ललित मोदी हे मोदी असल्यामुळे भारत सरकार त्यांना मदत करीत आहे. भाजपच्या या दुटप्पीपणाचा आम्ही निषेध करतो. स्वराज यांनी तडकाफडकी राजीनामा द्यावा, असे काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी म्हटले. हा वाद कसा सोडवावा याबद्दल पंतप्रधानांनी संसद आणि देशाला सांगावे. पंतप्रधान मौन पाळून आहेत, अशा परिस्थितीत त्यांनी मंत्रिमंडळातील एखाद्याकडे उत्तर देण्याची जबाबदारी सोपवायला हवी, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले.

‘ते’ पत्र जारी करा- चिदंबरम
-ललित मोदी यांना ब्रिटनमधून प्रवासाचे दस्तऐवज मिळवून देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी ब्रिटिश सरकारला दिलेले पत्र जारी करा अशी मागणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. सरकारने पारदर्शकता बाळगण्यासाठी सदर पत्र जारी करावे. लंडनमध्ये आश्रयाला असलेल्या ललित मोदींवर ब्रिटिश सरकार कारवाई का करीत नाही, असा सवालही त्यांनी केला. २०१३ मध्ये चिदंबरम यांनी ब्रिटिश अर्थमंत्री जॉर्ज ओसबोर्नी यांच्याशी चर्चा करताना ललित मोदींना ब्रिटनमधून हद्दपार करण्याची मागणी केली होती.

मित्रपक्ष सेनेकडून बचाव
-स्वराज यांच्यावर चौफेर हल्ले होत असताना रालोआतील घटक असलेल्या शिवसेनेने त्यांची खंबीरपणे पाठराखण चालविली आहे. मोदी सरकार कमकुवत आणि अस्थिर करण्यासाठी स्वराज यांना लक्ष्य बनविले जात आहे. स्वराज यांच्या नेतृत्वात विदेश मंत्रालयाने अतिशय चांगली कामगिरी केली असून हे मंत्रालय मोदी सरकारचा सशक्त स्तंभ बनला आहे. मोदींनी या अनुषंगाने बघावे, असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले. स्वराज यांची राजकीय पार्श्वभूमी आणि कार्य पाहता त्यांच्यावर होत असलेली टीका पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रुडी यांनी म्हटले.

ललित
मोदींना भारतात आणा
- स्वराज आणि ललित मोदी यांच्यातील संपर्क लाभ पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने होता. ललित मोदी २०१० पासून फरार असून लंडनमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्यावर ७०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा(काळा पैसा), कर बुडवल्याचा आरोप असून अनेक गुन्हे दाखल आहेत, असे सांगत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पी.एल. पुनिया यांनी त्यांना मायदेशी परत आणा अशी मागणी केली.

काँग्रेसचे

नऊ
सवाल
-ललित मोदी ७०० कोटी रुपये देशाबाहेर घेऊन गेले. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग, मॅचफिक्सिंग आणि सट्टेबाजीचे आरोप आहेत. ललित मोदींना मदत करीत पंतप्रधानांनी लाभ पदरात पाडून घेतला काय?
- स्वराज यांनी पंतप्रधान मोदींच्या संमतीनेच त्यांना मदत केली काय? आदी नऊ सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूर्जेवाला यांनी हल्ल्याचा रोख पंतप्रधानांकडे वळविला आहे.
-पंतप्रधानांनी अर्थपूर्ण मौन पाळले असल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल गंभीर संशय व्यक्त होत आहे, असे ते पत्रपरिषदेत म्हणाले.

Web Title: Modi's blessings on Modi; Rahul's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.