मोदींच्या लाखमोलाच्या सूटचा लिलाव ?
By Admin | Updated: February 13, 2015 12:48 IST2015-02-13T12:48:14+5:302015-02-13T12:48:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-याच्या वेळी घातलेल्या लाखमोलाच्या सूटचा लिलाव होण्याची शक्यता आहे.
मोदींच्या लाखमोलाच्या सूटचा लिलाव ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-याच्या वेळी घातलेल्या लाखमोलाच्या सूटचा लिलाव होण्याची शक्यता आहे. या सूटचा लिलाव करुन त्यातून येणारे पैसे हे समाज कार्यासाठी वापरले जातील असे सूत्रांचे म्हणणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळातील काही वरिष्ठ नेत्यांनी सूटचा लिलाव करण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे. या सूटमधून मिळणारा निधी स्वच्छ भारत अभियानात वापरावा असेही मोदींना सूचवण्यात आले आहे. या सूटच्या लिलावासाठी वाराणसीतील एका समाजसेवी संस्थेची निवड केली जाईल व या संस्थेच्या माध्यमातूनच लिलावाची प्रक्रीया पार पडेल अशी चर्चा आहे. अद्याप एनजीओची निवड झालेली नाही. सूटचा लिलाव होणार की नाही यावर भाजपाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
नरेंद्र मोदींनी ओबामांच्या भारत दौ-यात संयुक्त पत्रकार परिषदेत बंद गळ्याचा काळा सूट घातला होता. या सूटवर उभ्या रेषेत सोनेरी धाग्याने 'नरेंद्र दामोदार मोदी' असे बारीक अक्षरात वीणकाम केले होते. या सूटची किंमत किमान सहा लाख रुपये असल्याचा दावा केला जात होता. स्वतःचे नाव वीणलेला ऐवढा महागडा सूट घातल्याने नरेंद्र मोदींवर चोहोबाजूंनी टीका होत होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही महागडा सूट घातल्यावरुन मोदींवर निशाणा साधला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींना हा सूटच महागात पडला अशी चर्चा दिल्लीत रंगली होती.