काळ्या पैश्यावरून मोदींचे 'आप'वर टीकास्त्र
By Admin | Updated: February 3, 2015 18:34 IST2015-02-03T17:10:36+5:302015-02-03T18:34:48+5:30
आम्हाला चोर दरोडेखोर ठरवणा-यां केजरीवाल यांच्या खात्यात अर्ध्यारात्री कुठून पैसे येतात हे त्यांनाच माहित नसते असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला लगावला आहे.

काळ्या पैश्यावरून मोदींचे 'आप'वर टीकास्त्र
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३- रोहिणी येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी आप वर सडकून टीका केली आहे. काळ्यापैशाबाबत आक्रमक असणा-या केजरीवाल यांना स्वतःच्या खात्यात कुठून पैसे येतात याची साधी कल्पना नसते असे म्हणत त्यांनी आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले. निवडून आल्यावर त्यांनी काही काळातच राजीनामा दिला, व जनतेला फसवले, तसेच काँग्रेस हा मोठा पक्ष आहे त्यांनी तुम्हाला १५ वर्ष फसवले त्यांच्या चुका बाहेर काढण्याची आम्हाला संधी द्या असे मोदींनी जनतेला आव्हान केले.
तसेच सोनिया व राहूल गांधी यांचा उल्लेख टाळत आई व मुलाचे आज कुणीही ऐकत नाही, जनता ज्यावेळी रुसते त्यावेळी काय होते याचे उदाहरण म्हणून मोदींनी सोनिया व राहूल गांधींकडे अंगुलीदर्शन केले. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना दिल्लीतील संवेदनशील विषय ठरलेल्या अनधिकृत वसाहती अधिकृत करणार असल्याची घोषणा मोदींनी आपल्या भाषणातून केली. आदिवासी व दलितांसाठी असलेल्या योजनांमधून करोडो रुपये उकळले जातात परंतू ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांची अवस्था वाईटच राहते. ही परिस्थिती आम्ही बदलणार आहोत, दलित व आदिवासींसाठी असलेल्या योजनांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचेही मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचप्रमाणे, २०२२ साली भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यावेळी प्रत्येक व्यक्तिचे स्वतःचे पक्के घर असावे या बाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे घराजवळच जनतेला रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन मोदींनी यावेळी दिले. खेड्यातील जनतेला प्राथमिक सुविधा देण्यावर आमचा भर असेल तसेच जनतेने सौर ऊर्जेचा पावर करावा व अनावश्यक सौर ऊर्जा सरकारला विकावी या योजनेवर आम्ही भर देणार असल्याचेही मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. किरण बेदींना एक हाती सत्ता देऊन विजयी करा असे आव्हान करत त्यांनी आपले भाषण संपवले.