विधानसभेच्या कामाला लागा - मोदी

By Admin | Updated: June 1, 2014 12:48 IST2014-06-01T12:47:57+5:302014-06-01T12:48:07+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणिसांची भेट घेऊन महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

Modi will work for the assembly | विधानसभेच्या कामाला लागा - मोदी

विधानसभेच्या कामाला लागा - मोदी

शिथिलता नको : भाजपा सरचिटणीसांशी चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणिसांची भेट घेऊन महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष अधिक बळकटीने कामाला लावण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र व हरियाणात पावसाळ्यानंतर लगेच तर झारखंड, जम्मू-काश्मीर व बिहारमध्ये वर्षअखेर विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. मोदींनी भाजपाच्या १० सरचिटणिसांना सकाळी आपल्या निवासस्थानी न्याहारीसाठी बोलावले व त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. पक्षनेत्यांनी सामान्य नागरिक व सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करावे, असे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच प्रशासन अधिक सक्षम व पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सूचना करण्याचेही त्यांना आवाहन केले. मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पक्षनेत्यांशी त्यांनी एकत्रितपणे घेतलेली ही पहिलीच भेट होती. या न्याहारी बैठकीस भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह राम लाल, अमित शहा, अनंत कुमार, धर्मेंद्र प्रधान, वरुण गांधी, राजीव प्रताप रुडी. थावरचंद गेहलोत, जे. पी. नड्डा, तपिर गाओ व मुरलीधर राव हे सरचिटणीस हजर होते. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाच्या केंद्रीय पदाधिकार्‍यांपैकी अनेक नेते सरकारमध्ये सामील झाल्याने पक्षात लवकरच नवे पदाधिकारी नेमावे लागणार आहेत. यादृष्टीनेही या बैठकीस महत्त्व दिले जात आहे. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर पक्षसंघटनेत शिथिलता येऊ नये व आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही पक्षसंघटना अशाच निवडणूक ‘मोड’मध्ये राहावी यासाठी मोदींनी ही बैठक घेतल्याचे वरिष्ठ पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. सामान्य लोक आणि पक्ष समर्थकांकडून येणार्‍या सूचनांचा सुशासनासाठी कसा उपयोग करून घेता येईल, यावरही त्यांनी विचारविनिमय केल्याचे कळते.

अच्छे दिन आ गये

रविवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी अशोक रोडवरील भाजपाच्या राष्ट्रीय मुख्यालयास भेट देऊन पक्षाचे पदाधिकारी व कार्यालयीन कर्मचार्‍यांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतील. घेतलेल्या कष्टांची बक्षिसी म्हणून सुमारे १०० कार्यालयीन कर्मचार्‍यांना तीन महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्याची घोषणा या वेळी केली जाईल, असे समजते. पक्षाध्यक्ष पदावर चर्चा भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंग सरकारमध्ये सामील झाल्याने त्यांच्याजागी पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, यावर मोदी यांनी शुक्रवारी रात्री स्वत: राजनाथ सिंग व माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.

‘केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ घोषणा चांगलीच

औरंगाबाद : ‘केंद्रात नरेंद्र अन राज्यात देवेंद्र’ ही घोषणा चांगलीच असल्याचे सांगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंढे यांनी महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री हा भाजपाचा असल्याचे सुचोवात करीत मुख्यमंत्रीपदासाठी भाजपात सुरू झालेल्या सुंदोपसुंदीवर शिक्कामोर्तब केले.

> केंद्रीय ग्रामविकासमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर मुंडे शनिवारी पहिल्यांदाच शहरात आले होते. ‘केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र’ ही घोषणा कशी वाटते? पत्रकारांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना बराच मोठा ‘पॉज’ घेत मुंडे म्हणाले, ‘चांगली वाटते’. तत्पूर्वी राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोेघेही मुख्यमंत्रीपदाचा दावा करीत आहेत, असा प्रश्न विमानतळातून बाहेर पडताना पत्रकारांनी मुंडे यांना विचारला होता. तेव्हाही संदिग्ध उत्तर देत ते म्हणाले, महायुती राज्याचे नेतृत्व करील़

Web Title: Modi will work for the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.