मोदी स्वतःच स्वतःच्या पराभवाचा पाया रचताहेत; अरुण शौरींनी 'असं' मांडलं समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 06:01 PM2018-03-23T18:01:20+5:302018-03-23T18:04:50+5:30

ही मोदींच्या आक्रमक राजकारणाची निर्मिती आहे, असे शौरी यांनी म्हटले.

Modi Will Succeed Says Arun Shourie On 2019 Polls. It's A Taunt | मोदी स्वतःच स्वतःच्या पराभवाचा पाया रचताहेत; अरुण शौरींनी 'असं' मांडलं समीकरण

मोदी स्वतःच स्वतःच्या पराभवाचा पाया रचताहेत; अरुण शौरींनी 'असं' मांडलं समीकरण

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची कार्यपद्धती पाहता 2019 पर्यंत ते स्वत:च्या पराभवासाठी जमीन तयार करण्यात नक्कीच यशस्वी ठरतील, असा खोचक टोला भाजपाचे ज्येष्ठ अरूण शौरी यांनी लगावला. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी आगामी काळातील राजकीय परिस्थितीसंदर्भात भाष्य केले. 

यावेळी त्यांनी म्हटले की, मोदी सध्या विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. मी तुमच्यापैकी प्रत्येकाला वेचून संपवेन, अशी भावना ते विरोधकांच्या मनात तयार करत आहेत. तुम्ही सर्वजण एकत्र आला नाही तर तुम्हाला आमच्यापासून धोका राहील, असा संदेशच त्यांनी आपल्या कृतीमधून विरोधकांना दिला आहे. त्यांच्या याच वृत्तीमुळे अनेक ठिकाणी नवे नेतृत्त्व उदयाला आले आहे. गुजरातमध्ये पाहिल्यास याचे प्रत्यंतर येऊ शकते. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर हे नेते शुन्यातून उदयाला आले आहेत. ही मोदींच्या आक्रमक राजकारणाची निर्मिती आहे, असे शौरी यांनी म्हटले. 

तसेच शौरी यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांकडे आश्वासक चेहरा नसल्याचा आक्षेपही खोडून काढला. या मुद्द्याचा नको इतका बागुलबुवा करण्यात आला आहे. १९७७ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची संपूर्ण देशात लाट असताना तेव्हा त्यांना हरवण्यासाठी कोणताच चेहरा नव्हता. लोकांनीच त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हरवण्यासाठी चेहऱ्याची गरज नाही, असे शौरी यांनी सांगितले. याशिवाय, २०१९ साठी भाजपच्या विरोधात आताच महाआघाडी स्थापन करणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. परंतु, मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशाचे पतन होईल, असे केवळ विरोधकांनाच वाटत नाही, तर भाजपच्या घटक पक्षांनाही वाटत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
 

Web Title: Modi Will Succeed Says Arun Shourie On 2019 Polls. It's A Taunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.