अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीस मोदी अनुपस्थित राहणार
By Admin | Updated: February 12, 2015 11:48 IST2015-02-12T11:48:00+5:302015-02-12T11:48:38+5:30
दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवणा-या अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहणार आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीस मोदी अनुपस्थित राहणार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवणा-या अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहणार आहेत. १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र दौ-यावर असल्याने शपथविधी सोहळ्यास येता येणार नाही असे नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांना सांगितले आहे. मात्र दिल्लीच्या विकासासाठी केंद्राकडून सहकार्य मिळेल तसेच दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर विचार करु असे आश्वासन मोदींनी केजरीवाल यांना दिले आहे.
दिल्लीत भाजपाचा दारुण पराभव करणा-या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 'चाय पे चर्चा' केली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे १५ मिनीटे चर्चा झाली. केजरीवाल यांच्यासोबत मनिष सिसोदीयाही उपस्थित होते. मोदींनी पुष्पगुच्छ देत दोघांचे स्वागत केले. चर्चेदरम्यान केजरीवाल यांनी मोदींना १४ फेब्रुवारी रोजी होणा-या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले. मात्र याच दिवशी महाराष्ट्रात पूर्वनियोजीत कार्यक्रम असल्याने शपथविधीला उपस्थित राहता येणार नाही असे मोदींनी केजरीवाल यांना सांगितले. त्यामुळे केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला मोदी अनुपस्थित राहणार हे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सकारात्मक वातावरणात चर्चा झाली असे मनिष सिसोदीया यांनी पत्रकारांना सांगितले.
१४ फेब्रुवारीरोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असून शनिवारी सकाळी शरद पवार यांच्या बारामतीतील एका कार्यक्रमात मोदी उपस्थित असतील. यानंतर दुपारी पुणे व संध्याकाळी मुंबईतील एका कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहे. १४ फेब्रुवारीला मोदी शनिवारी सकाळी सात वाजता दिल्लीतून निघणार असून रात्री उशीरा ते दिल्लीत परततील असे सूत्रांनी सांगितले.