रशियात मोदी-शरीफ भेट?
By Admin | Updated: July 6, 2015 23:37 IST2015-07-06T23:37:12+5:302015-07-06T23:37:12+5:30
शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात चर्चा अपेक्षित आहे.

रशियात मोदी-शरीफ भेट?
नवी दिल्ली : येत्या १० जुलैला रशियात होऊ घातलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात चर्चा अपेक्षित आहे. सूत्रांनी ही माहिती दिली.
नरेंद्र मोदी सोमवारी रशियासह कझाखस्तान, उजबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान आणि ताझिकिस्तान या पाच मध्य आशियाई देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ८ व ९ जुलैला ते रशियातील उफा येथे ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समूह) शिखर परिषदेत भाग घेतील. १० जुलैला ते येथील एससीओ शिखर परिषदेत भाग घेतील.
एससीओ शिखर परिषदेदरम्यान मोदी-शरीफ यांची भेट होणे अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अर्थात या भेटीबाबत तूर्तास अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
> गतवर्षी नोव्हेंबरमध्ये काठमांडूमधील सार्क शिखर संमेलनात मोदी-शरीफ यांची भेट झाली होती. मात्र, त्यावेळी उभय नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारची द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती. अलीकडे मोदींनी शरीफ यांना पवित्र रमजान महिन्याच्या फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या.
> तसेच शांततापूर्व द्विपक्षीय संबंधांची कामना केली होती. मोदींनी आपल्या ताज्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान पाकिस्तानवर टीका केली होती. यानंतर दोन्ही देशांच्या नेतृत्वात वाक्युद्ध आरंभले होते.