बिहार पराभवासाठी मोदी, शाह, जेटलींचे त्रिकुट जबाबदार - अरूण शौरी
By Admin | Updated: November 9, 2015 11:02 IST2015-11-09T10:59:00+5:302015-11-09T11:02:32+5:30
बिहार पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अरूण जेटली' यांचे त्रिकुट जबाबादार असल्याची टीका अरूण शौरींनी केली आहे.

बिहार पराभवासाठी मोदी, शाह, जेटलींचे त्रिकुट जबाबदार - अरूण शौरी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढणा-या भाजपाचा बिहार निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यानंतर भाजपावर चहूबाजूंनी टीका होत असून माजी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनीही भाजपा नेतृत्वावर टीकास्त्र सोडत 'बिहार पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अरूण जेटली' यांचे त्रिकुट जबाबादार असल्याचा आरोप केला. भाजपा सरकारवर तसेच मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज असणा-या अरूण शौरींना गेल्या काही दिवसांपासून भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी मोदी, शहा व जेटलींना जबाबादर ठरवले आहे.
भाजपाध्यक्ष अमित शहा हे पक्ष नीट चालवत नसल्याची टीका करतानाच पक्षातच अध्यक्षांविरोधात मोहिम सुरू असल्याचे शौरी यांनी सुनावले. हा पराभव म्हणजे भाजपाला बसलेला जोरदार फटका असल्याचेही त्यांनी म्हटले. भाजपा सरकार सत्तेवर येऊन दीड वर्ष झालेले असतानाही कोणतेही काम झालेले नाही. जनतेचा पंतप्रधान मोदींवरचा विश्वास कमी झाल्याचेही शौरी यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात १५ लाख असतील, असे आश्वासन दिले होते, मात्र अमित शहांनी त्याला 'निवडणुकीचा जुमला' म्हटले. अशा स्थितीत लोकांचा पंतप्रधानांवरील विश्वास डळमळीत होणार नाही का? असा सवाल त्यांनी विचारला.
बिहारमधील पराभवानंतर अमित शहा आणि जेटलींवर मोदी कारवाई करतील का असा सवाल त्यांना विचारण्यात आला असता मोदी, शहा आणि जेटली हे तिघेही एकच असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे शक्यच नसल्याचे शौरी यांनी म्हटले.
दादरी हत्याकांड व देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या मुद्यावरील पंतप्रधानांच्या मौनावरही शौरी यांनी टीका केली. पंतप्रधान प्रत्येक मुद्यावर स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, असं त्यांचे मंत्री म्हणतात, पण देशाचे पंतप्रधान अनेक छोट्या मुद्यांवर ट्विट करत असतात, मग दादरीसारख्या संवेदनशील मुद्यांवर ते मौन कसे बाळगू शकतात? असा सवाल विचारत त्यांनी मोदींच्या भूमिकेवर नाराजी वर्तवली.