गुजरातच्या निरोपाने मोदी भावुक
By Admin | Updated: May 22, 2014 02:33 IST2014-05-22T02:33:58+5:302014-05-22T02:33:58+5:30
नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेचा औपचारिक निरोप घेतला.

गुजरातच्या निरोपाने मोदी भावुक
नंदकिशोर पुरोहित, गांधीनगर - नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेचा औपचारिक निरोप घेतला. अत्यंत भावुक वातावरणात झालेल्या विधानसभेच्या विशेष सत्रात काँग्रेस आमदारांसह सर्वच सदस्यांनी पंतप्रधानपदी काम करताना गुजरातबरोबरच स्नेहबंध कायम ठेवण्याची विनंती केली. मोदी यांनी ही गुजरातकडे लक्ष देण्याचे आश्वासन देतानाच या राज्याच्या विकासाची गती सध्या आहे तशीच पुढेही राहील, असा विश्वासही व्यक्त केला. मुख्यमंत्रीपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात आपल्या हातून कळत-नकळत काही चूक झाली असेल तर, मला माफ करा, असे ते गुजरातच्या जनतेला म्हणाले. विधानसभा सदस्यांना संबोधित करताना मोेदी म्हणाले की, मुख्यमंत्री या नात्याने आपण प्रत्येक सदस्याचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. संस्थांना बळकटी देण्याच्या दृष्टीने काम केले. याच सभागृहाने आपल्याला प्रशासकीय कामकाज शिकवले. वस्तुत: प्रशासकीय कार्याची ही आपली पहिली शाळाच होती, असे म्हणाले. यावेळी त्यांचा गळा दाटून आला होता. विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी शाल देऊन मोदींचा सन्मान केला होता. त्याचा उल्लेख करून मोदींनी वाघेला यांच्यासमवेत मोटारसायकलवर बसून गुजराच्या प्रत्येक जिल्हा कसा पिंजून काढला होता, याची आठवण सांगितली. त्यामुळे आता शंकरसिंह वाघेला सांगू शकतील की, देशाचे पंतप्रधान आपल्याबरोबर मोटारसायकलवर फिरत होते, अशी मिश्किल टिपणीही त्यांनी केली. महात्मा गांधी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव घेतले असते तर, बहुधा गुजराती असल्याने गुजराती व्यक्तीचे नाव पुढे केल्याचा आरोप झाला असता, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. आताही त्याच धर्तीवर पंतप्रधान म्हणून गुजरातकडे विशेष लक्ष देऊ. गुजरातला त्याचा हक्क मिळेल याकडे लक्ष देऊच, पण त्याकरिता इतर राज्यांच्या हक्कावर गदा तर येत नाही ना, याकडे लक्ष देऊ, असे ते म्हणाले.