मोदी म्हणाले, कमिशन कमावणे हेच ‘त्यांचे’ लक्ष्य; ‘ते’ लाेकशाहीला लावताहेत नख, गांधींचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 08:57 AM2024-04-07T08:57:53+5:302024-04-07T09:02:18+5:30

नरेंद्र मोदींचा ‘इंडिया’ आघाडीला जाेरदार टाेला, राजस्थानातील सभेत सोनियांचा घणाघात

Modi said; 'Their' goal is to earn commission; Gandhi's counter-attack, 'they' put the democracy to the test | मोदी म्हणाले, कमिशन कमावणे हेच ‘त्यांचे’ लक्ष्य; ‘ते’ लाेकशाहीला लावताहेत नख, गांधींचाही पलटवार

मोदी म्हणाले, कमिशन कमावणे हेच ‘त्यांचे’ लक्ष्य; ‘ते’ लाेकशाहीला लावताहेत नख, गांधींचाही पलटवार

सहारणपूर (उत्तर प्रदेश) : सत्तेवर येऊन ‘कमिशन’ कमावणे, हेच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे लक्ष्य आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) ही एक ‘मिशन’ आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

सहारणपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी यांनी सांगितले की, भाजपला ३७० जागा जिंकण्यापासून रोखण्याच्या एकमेव उद्देशाने विरोधक निवडणूक लढवित आहेत. समाजवादी पार्टी (सपा) दर तासाला उमेदवार बदलत आहे. काँग्रेसला उमेदवारच सापडत नाहीयेत. 
मोदी यांनी काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना म्हटले की, जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप आहे. काही भागांवर डाव्यांचा प्रभाव दिसून येत आहे. शक्तीची पूजा करणे हा आपल्या आध्यात्मिक यात्रेचा भाग आहे, तरीही इंडिया आघाडीचे लोक म्हणत आहेत की, त्यांना शक्तीच्या विरुद्ध लढायचे आहे. तर, जाहीरनाम्याच्या नावाखाली असत्याचा कागद सादर केला, अशी टीकाही मोदींनी राजस्थानमधील पुष्कर येथील प्रचारसभेत केली.

वर्धापन दिनानिमित्त दिल्या भाजप सदस्यांना शुभेच्छा
नवी दिल्ली : विकसित भारतासाठी तयार करण्यात आलेला पाया आणखी मजबूत करण्यासाठी लोक पुन्हा एकदा भाजपलाच निवडून देतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. भाजपच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त  ‘एक्स’वर जारी केलेल्या एका 
पोस्टमध्ये मोदी यांनी भाजप सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

विरोधक द्वेष पसरवत आहेत : राजनाथ सिंह
सिंगरौली (मध्य प्रदेश) : भाजप आपला शब्द पाळतो. भाजपने जाहीरनाम्यात दिलेलेे प्रत्येक आश्वासन पूर्ण केले. भाजप जनतेवर राज्य करत नाही, तर त्यांची सेवा करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी नागरिकांच्या हालअपेष्टा कमी करण्याची आहे, तर निरुपयोगी विरोधी पक्ष द्वेष पसरविण्याचे काम करीत आहेत, अशी टीका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. सीधी लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ राजवट भ्रष्टाचाराने बरबटलेली होती. त्यामुळे काही मंत्र्यांना तेव्हा तुरुंगात टाकण्यात आले होते, असा उल्लेखही सिंह यांनी केला.

जयपूर : केंद्रातील सरकार देशाच्या प्रतिष्ठेला आणि लोकशाहीला तडा देत आहेत, अशा शब्दात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शनिवारी राजस्थानात एका सभेत टीका केली. तर, विरोधी नेत्यांना भाजपमध्ये सहभागी करण्यासाठी विविध डावपेचांचा वापर केला जात आहे, असा दावा त्यांनी केला.
येथील विद्याधर नगर येथे आयोजित प्रचारसभेत सोनिया गांधी बोलत होत्या. सोनिया म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांपासून आपला देश अशा सरकारच्या हातात आहे ज्याने बेरोजगारी, महागाई, आर्थिक संकट, असमानता आणि अत्याचारांना चालना देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आज आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि आपली राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. संपूर्ण व्यवस्थेत भीती बसवली जात आहे. देश ही काही मोजक्या लोकांची मालमत्ता नसून तो सर्वांचा आहे. आपल्या पूर्वजांनी त्यासाठी रक्त सांडले आहे. पण हे जाणून घ्या की निराशेसोबतच आशाही जन्माला येते, असे सोनिया म्हणाल्या.

पोट भरणे झाले कठीण
महागाई आणि बेरोजगारीचा संदर्भ देत सोनिया गांधी म्हणाल्या की, आज रोजच्या कमाईतून पोट भरणे कठीण झाले आहे. कष्टकरी कामगाराच्या मेहनतीचे मोल कमी होत आहे. स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंचा खर्च माझ्या बहिणींची वारंवार परीक्षा घेत आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले-मुली बेरोजगार आहेत.

केंद्राकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही : राहुल गांधी
हैदराबाद : देशात दररोज ३० शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करणाऱ्या केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केलेले नाही, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. ते येथे निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेसचा जाहीरनामा भारतीयांचा आवाज प्रतिबिंबित करतो. भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील कोट्यवधी लोक गरीब झाले. मोदींनी निवडणूक आयोगात आपल्या लोकांना नेमले असून, निवडणूक रोखे हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Modi said; 'Their' goal is to earn commission; Gandhi's counter-attack, 'they' put the democracy to the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.