नवी दिल्ली:रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज भारत दौऱ्यावर आले आहेत. काही वेळापूर्वीच येथील पालम विमानतळावर भारत आणि रशियाच्या घट्ट मैत्रीचे दृष्य पुन्हा एकदा संपूर्ण जगाने पाहिले. येथे पंतप्रधान मोदींनी पुतिन यांचे जोरदार स्वागत केले. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन हे दोन्ही नेते विमानतळावरून बाहेर पडताना एकाच कारमध्ये बसलेले दिसले. दरम्यान, पुतिन यांचे विमान उतरण्यापूर्वीच, त्यांचे विमान 'फ्लाइट रडार २४' वर जगात सर्वाधिक ट्रॅक केले जाणारे उड्डाण म्हणून नोंदवले गेले.
पुन्हा एकदा एकाच कारने प्रवास -पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन एकाच कारमधून विमानतळाबाहेर पडले. यापूर्वीही, सप्टेंबर २०२५ मध्ये चीनच्या तियानजिन शहरात झालेल्या शांघाय सहयोग संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून प्रवास केला होता. त्यावेळी ते बैठकीच्या ठिकाणाहून द्विपक्षीय चर्चेसाठी ठरलेल्या ठिकाणापर्यंत एकाच गाडीतून गेले होते.
तत्पूर्वी, चीनमध्ये झालेल्या SCO कार्यक्रमादम्यान, पंतप्रधान मोदींची कार पुतिन यांच्या 'ऑरस सिनेट' (Aurus Senat) कारच्या मागे होती. मात्र, दिल्लीत चित्र उलटे होते. येथे रशियन राष्ट्राध्यक्षांची कार पंतप्रधान मोदींच्या 'टोयोटा फॉर्च्युनर' (Toyota Fortuner) मागे दिसली.
अमेरिकेच्या दबावातही दिसली दृढ मैत्री - SCO शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांचा एकत्र प्रवास अत्यंत महत्त्वाचा मानला गेला. कारण त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्यावरून नवीन शुल्क (Tariff) आकारण्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत मोदी आणि पुतिन यांच्या एकाच कारमधील फोटोने, बळकट भागीदारीचा स्पष्ट संदेश ट्रम्प यांच्यासह संपूर्ण जगाला दिला होता.