राजघाटावर मोदींनी महात्मा गांधीना वाहिली आदरांजली
By Admin | Updated: May 26, 2014 13:12 IST2014-05-26T11:03:44+5:302014-05-26T13:12:45+5:30
पंतप्रधानपदाच्या शपथविधीला अवघे काही तास उरलेले असताना नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

राजघाटावर मोदींनी महात्मा गांधीना वाहिली आदरांजली
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २६ - पंतप्रधानपदाच्या शपथविधीला अवघे काही तास उरलेले असताना नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही भेट घेतली. त्यानंतर गुजरात भवन येथे मोदींनी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेतली.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन खास सजले असून देश-विदेशांतील पाहुण्यांच्या उपस्थिती संध्याकाळी सहा वाजता मोदी देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी सार्क' देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले असून सोमवारी सकाळीच श्रीलंकेचे महिंद्रा राजपक्षें, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई, तसेच मॉरिशिअसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम भारतात दाखल झाले. तर सकाळी ११च्या सुमारास पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे दिल्लीत आगमन झाले. मोदींच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी शरीफ भारतात आले असून त्यांच्यासोबत पत्नी व मुलगाही भारतात आले आहेत. दरम्यान आपण शांतीचा संदेश घेऊन जात आहोत, असे शरीफ यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सांगितले. या भेटीत भारतीय नेतृत्त्वाशी आपण सर्व मुद्द्यांवर चर्चा करू, असेही ते म्हणाले.