समर्थनासाठी मोदी जयललितांच्या दारी
By Admin | Updated: August 7, 2015 22:19 IST2015-08-07T22:19:29+5:302015-08-07T22:19:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची त्यांच्या पोस गार्डन या निवासस्थानी भेट घेऊन भोजन बैठकीत चर्चा केली

समर्थनासाठी मोदी जयललितांच्या दारी
चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची त्यांच्या पोस गार्डन या निवासस्थानी भेट घेऊन भोजन बैठकीत चर्चा केली. प्रमुख आर्थिक सुधारणा विधेयकांना समर्थन मिळविण्यासाठी रालोआ सरकारने चालविलेले प्रयत्न, विशेषत: वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबत शेतकऱ्यांच्या चिंता उपस्थित केल्या असताना जयललिता यांनी दिलेले समर्थन पाहता या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभेत अण्णाद्रमुकचे ३७, तर राज्यसभेत ११ खासदार आहेत. त्यामुळेच जयललितांचे समर्थन महत्त्वपूर्ण मानले जाते.
संसदेत सध्या महत्त्वाची विधेयके रखडली असून राज्यसभेत सरकार अल्पमतात असल्याने प्रादेशिक पक्षांचे समर्थन महत्त्वपूर्ण मानले जाते. मद्रास विद्यापीठातील राष्ट्रीय हातमाग महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मोदी भोजनाचे निमंत्रण स्वीकारत जयललितांच्या निवासस्थानी पोहोचले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. जयललिता यांनी बैठकीत कर्नाटक आणि केरळसोबतच्या जलतंट्यावर चर्चा करीत एक निवेदन सादर केले. (वृत्तसंस्था)